निधीअभावी मृत्यूनंतरही मुक्तीसाठी प्रतीक्षा

शवागार जवळपास फुल्ल : पालिकेला १५ लाखांचा निधी येणे बाकी


30th March, 11:50 pm
निधीअभावी मृत्यूनंतरही मुक्तीसाठी प्रतीक्षा

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील शवागार.
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : पालिकेने बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीवर खर्च केलेला सुमारे १५ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडून येणे बाकी आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून बेवारस मृतदेह शवागारात पडून असून शवागार फुल्ल झाले आहे. तत्काळ उपाययोजना न झाल्यास ‘गुडफ्रायडे’च्या कालावधीत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही. फॉरेन्सिक मेडिसिन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव पालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शवागारातील कॅबिनेट भरले आहेत. ख्रिश्चन समुदायामध्ये ‘मोंडी थर्सडे’ ते ‘ईस्टर संडे’ या काळात अंत्यसंस्कार केले जात नसल्याने दरवर्षी या काळात शवागारावरील ताण वाढतो. यावर्षी आधीच जागा नसल्याने नवीन मृतदेह स्वीकारणे अशक्य होणार आहे.
शवागारात जागाच नाही
शवागारातील ४६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणे बाकी आहे. दररोज दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात किमान १५ मृतदेह ठेवण्याची सोय असण्याची गरज भासते. पोलीस तक्रारींतील ३१ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असून त्यातील २७ मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाली आहे. शवागारात सध्या ७२ कॅबिनेट्स असून त्यातील १२ देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे वापरण्यायोग्य नाहीत.
जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करावा
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शवागारात नव्या मृतदेहासाठी जागा नाही. तातडीने बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावून जागा रिकामी केली नाही, तर सणासुदीच्या काळात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. नगरपालिकेने निधीचे कारण पुढे करून अंत्यसंस्कार थांबवल्याने जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
बेवारस मृतदेहांवर तीन वर्षांत १५.२१ लाखांचा खर्च
एप्रिल २०२२ ते मार्च २०२५ या कालावधीत बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी नगरपालिकेने १५.२१ लाख रुपये खर्च केले आहेत, जे सरकारकडून मिळालेले नाहीत. निधी मिळण्यासाठी पालिकेने जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२६ पर्यंत तब्बल नऊवेळा पत्रव्यवहार करूनही निधी मंजूर झालेला नाही.
एका बेवारस मृतदेहावर ३,६०० रुपयांचा खर्च
यापूर्वी पालिका बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलत होती. मात्र, पूर्वीपेक्षा आता या खर्चात वाढ झाली असून प्रति मृतदेह ३,६०० रुपये खर्च येतो. आर्थिक वर्ष संपत असल्याने पालिकेने ही थकबाकी तातडीने फेडण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली आहे. २०२५ मध्ये एकूण १०२ बेवारस मृतदेहांवर पालिने अंत्यसंस्कार केले. यावर्षी आतापर्यंत ३१ मृतदेहांची नोंद झाली आहे.