राज्यात २४ तासांत तीन ठिकाणी सुरीहल्ले

मयेत सख्ख्या भावाला भोसकले; कोरगावात दोघांना तिघांनी बदडले; वागातोर येथे मॅनेजरवर कर्मचाऱ्याचा हल्ला


30th March, 11:42 pm
राज्यात २४ तासांत तीन ठिकाणी सुरीहल्ले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली/पेडणे/म्हापसा : राज्यात २४ तासांत तीन ठिकाणी चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या. हळदणवाडी-मये येथे रागाच्या भरात सख्ख्या धाकट्या भावावर सुरीने हल्ला केल्याची घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या धाकट्या भावावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भावाला डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. चाकू हल्ल्याची दुसरी घटना कोरगावात घडली. येथे पूर्ववैमनस्यातून तिघांनी दोघा चुलत भावांवर चाकू आणि दंडुक्याने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. वागातोर येथे हॉटेल मॅनेजरवर तेथील कर्मचाऱ्याने चाकूहल्ला केला. सायंकाळी संशयित पोलिसांना शरण आला.
मये येथील हळदणवाडीत कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरा सागर माईणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संजय गुरुदास माईणकर (४१) याने धाकटा भाऊ सागर (३८) याच्यावर हल्ला केला. २९ मार्च रोजी रात्री सुमारे ९.३० ते ११.१० च्या दरम्यान ही घटना घडली. संजय आपल्या घरी आला असता सागरने दरवाजा उघडला नाही. या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात झाले. रागाच्या भरात संजयने सागरवर सुरीचे वार केले. यात सागर माईणकर गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी संजय माईणकर याला ३० मार्च रोजी सकाळी अटक केली.
भारतीय न्याय संहितेचे कलम १०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरीशचंद्र मडकईकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीदेवी आणि पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश परवार करत आहेत...
पूर्ववैमनस्यातून कोरगावात हल्ला; तिघांना अटक
भटवाडी-कोरगाव येथे जुन्या वादातून मुकुंद नर्से व त्यांचा चुलत भाऊ सच्चिदानंद नर्से यांच्यावर चाकू आणि दांडक्याने हल्ला करण्यात आला. पेडणे पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
पेडणे पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, २९ रोजी रात्री भाटवाडी-कोरगाव येथे संशयित ऋषिकेश संतोष नर्से (३५), स्नेहल संतोष नर्से (२९) व शुभम नवनाथ नर्से (३०, सर्व रा. भटवाडी-कोरगाव) यांनी पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ केली आणि चाकूने वार केले. तसेच लाकडी दांडा, प्लास्टिक पाईप, लाथा आणि ठोसे मारून मारहाण केली. या मारहाणीत दोघांनाही रक्तस्त्राव झाला. संशयितांनी अॅक्टिव्हा स्कूटर (क्र. जीए ११ एफ ११४८) दुचाकीचेही अंदाजे १५,००० रुपयांचे नुकसान केले.
या प्रकरणी पोलिसांनी मुकुंद दिनानाथ नर्से यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ३५२, ३२४(४), ११५(२), ११८(२) आणि ३५१(२)(३) ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. संशयित ऋषिकेश नर्से, स्नेहल नर्से व शुभम नर्से यांना २९ रोजी रात्री उशिरा अटक केली. पोलिसांनी त्यांना ३० रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पेडणे पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहिल नाईक पुढील तपास करत आहेत.
वागातोर येथील संशयित पोलिसांना शरण
प्रतिनिधी गोवन वार्ता
म्हापसा : वारंवार काम करायला सांगून छळ केला जात असल्याच्या रागातून रिसॉर्टच्या व्यवस्थापकावर सुरीहल्ला करण्याचा प्रकार वागातोर येथे घडला. या हल्ल्यात सुनील सिंग (३३, उत्तराखंड) गंभीर जखमी झाले. घटनेनंतर शरण आलेला संशयित मोहम्मद अश्रफ (३५, रा. पश्चिम दिल्ली) याला हणजूण पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना सोमवारी सायंकाळी ४.१० च्या सुमारास कुतिन्होवाडो, वागातोर येथील व्हाईट फ्लॉवर कॉटेजिस रिसॉर्टमध्ये घडली. रिसॉर्टचे कामगार मोह. बेलाल (मूळ बिहार) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार, वारंवार वेगवेगळी कामे करायला सांगत संशयित कामगाराने व्यवस्थापक सुनील सिंग यांच्याशी वाद घातला. रागाच्या भरात संशयिताने बार काऊंटरच्या परिसरातील सुरी उचलली आणि सुनील सिंग यांच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात रक्तस्राव झाल्यामुळे सुनील गंभीर जखम झाले. घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांनी संशयिताला बाजूला केले आणि त्याच्या हातातील सुरी काढून घेतली. रुग्णवाहिका बोलावून जखमीला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले.
संशयिताने हणजूण पोलिसांशी संपर्क साधून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि भा. न्या.स.च्या कलम १०९(१) अन्वये खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितेश शिंगाडी करत आहेत.