विहिरीतील पाण्याने घेतला पेट; सिंदोळी-सांकवाळ येथे संताप

पाण्याला इंधनाचा वास : स्थानिकांकडून चिंता व्यक्त


30th March, 11:49 pm
विहिरीतील पाण्याने घेतला पेट; सिंदोळी-सांकवाळ येथे संताप

इंधनमिश्रित पाण्याला लागलेली आग पाहताना आमदार आंतोनियो वाझ व इतर.
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : सिंदोळी-सांकवाळ येथील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्चच्या परिसरातील विहिरीतील पाण्याला इंधनाचा वास येऊ लागल्याने, तसेच इंधनमिश्रित पाणी पेट घेऊ लागल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. जवळच्या स्रोतांत इंधन मिसळण्याची भीती व्यक्त होत आहे. कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. इंधनाचा स्रोत शोधला जात आहे.
अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च परिसरातील विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. विहिरीच्या पाण्याला वास येत असल्याचे जानेवारीत उघडकीस आले होते. विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याचे ठरले होते. काहीच कार्यवाही न झाल्याने विहिरीतील पाण्यामध्ये इंधनाची मात्रा वाढू लागली. इंधनाची मात्रा वाढल्याने पाण्याला उग्र वास येऊ लागला. याबाबत चर्च समिताला व इतरांना माहिती दिली आहे.
सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य सुनील गावस, पोलीस अधीक्षक गुरुदास कदम यांनीही पाहणी केली. तेथे सध्या वेर्णा स्थानकातील पोलीस तैनात आहेत. सांकवाळच्या वरच्या भागात इंधनाच्या टाक्या आणि दोन पेट्रोल पंप आहेत. तेथे इंधन झिरपून जमिनीतील झऱ्याद्वारे विहिरीत आले असल्याची शक्यता आहे. सांकवाळ गावात यापूर्वीही इंधन झिरपून विहिरीतील पाणी दूषित होण्याचे प्रकार घडल्याचे काही जणांनी सांगितले.
आमदार वाझ यांची पाणी तपासण्याची सूचना
आमदार वाझ यांनी सांगितले की, संबंधित खात्यांना विहिरीतील पाण्याची तपासणी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. जलस्रोत खात्याने नजीकच्या विहिरी, तळ्यांतील पाण्याचे नमुने चाचणीसाठी घेतले आहेत. विहिरीमध्ये इंधन कोठून मिसळले याचा शोध घेण्यात येत आहे. विहिरीतील पाणी पेट घेत असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे.