‘एजी’ पांगम यांची माहिती : याचिका निकालात

पणजी : काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर यांची मुरगाव उपजिल्हाधिकारीपदी, तर त्याजागी असलेले भगवंत करमली यांची काणकोणमध्ये बदली करण्यात येणार आहे. या संदर्भात पुढील एक दोन दिवसात सरकार आदेश जारी करणार आहे, अशी माहिती अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने या संदर्भातील याचिका निकालात काढली.
या प्रकरणी काणकोण नगरपालिकेचे नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला प्रतिवादी केले आहे. त्यानुसार, काणकोण नगरपालिकेचे मतदार असलेले अधिकारी प्रतापराव गावकर यांची २९ एप्रिल २०२५ रोजी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांची काणकोण तालुक्यासाठी ‘निवडणूक नोंदणी अधिकारी’(ईआरओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे मतदारसंघाचे सीमांकन करण्याची जबाबदारी देण्यात आली. गावकर हे काणकोण मतदारसंघाचे स्वतः मतदार आहेत. तसेच ते काणकोण नगरपालिकेचेही मतदार आहेत. याशिवाय त्यांच्या चुलत भावांपैकी एक जण सध्या काणकोण नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे सीमांकन प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. ही नियुक्ती ‘हितसंबंधांचा संघर्ष’ निर्माण करणारी अाहे, असा दावा करून याचिकादार कोमरपंत यांनी या नियुक्तीला आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी न्यायालयात मागील सुनावणीवेळी याचिकादारातर्फे अॅड ओम डिकोस्टा यांनी वरील मुद्दे उपस्थित केले होते.
दरम्यान या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली असता, सरकार काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रतापराव गावकर यांची मुरगाव उपजिल्हाधिकारी तर त्याजागी असलेले भगवंत करमली यांची काणकोणचे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात येणार आहे. यासंदर्भात पुढील एक दोन दिवसात सरकार आदेश जारी करणार आहे. अशी माहिती अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका निकालात काढली.