पणजी बाजारात मानकुराद @ १५०० रुपये डझन

आंबा खवय्यांना दिलासा : आवक वाढल्यामुळे दरात घट, भाज्यांचे दर स्थिर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th March, 11:29 pm
पणजी बाजारात मानकुराद @ १५०० रुपये डझन

पणजी बाजारात दाखल झालेले मानकुराद. (नारायण पिसुर्लेकर) 

पणजी : येथील बाजारात मानकुराद आंब्यांची आवक आता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले मानकुरादचे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले आहेत. सोमवारी लहान आकाराचा मानकुराद आंबा दीड हजार रुपये, तर मध्यम आकाराचे आंबे अडीच हजार, तर मोठ्या आकाराचे रुपये ४ हजार रुपये डझन या दराने विकले जात होते.
याशिवाय, बाजारात आता हापूस आंबादेखील दाखल झाला असून तो २,००० रुपये डझन या दराने उपलब्ध आहे. याशिवाय सर्वसामान्य ग्राहकांसाठी तोतापुरी आंबे १५० रुपये किलो, तर कच्च्या कैऱ्या १०० रुपयांना ४ ते ५ नग या दराने विकल्या जात आहेत.सोमवारी पणजी बाजारात शेवग्याचे दर कमी झाले. शेवग्याच्या शेंगा ५० रुपयाला ६ या दराने विकल्या जात होत्या. नारळ आकारानुसार ३० ते ५० रुपये नग होता. मागील आठवड्याच्या तुलनेत सोमवारी बाजारातील अन्य भाज्यांचे दर स्थिर होते. लहान लसूण १५० रुपये, तर मोठा लसूण ४०० रुपये किलो होता. आल्याचे दर १८० ते २०० रुपये किलो होते. कांदा, बटाटा आणि टोमॅटो प्रत्येकी ४० रुपये किलो झाले. भेंडी, वांगी, कारले ८० रुपये किलो होती. मिरचीचे दर २० रुपयांनी कमी होऊन १०० रुपये किलो झाले.
फ्लॉवर ५० रुपये नग या दराने विकला जात होता. तर कोबीचे दर ४० रुपये किलो होते. वालपापडी दर्जानुसार ८० ते १२० रुपये किलो होती. काकडी ६० रुपये किलो होती. मेथीची एक जुडी २५ रु., पालक, कांदा पात प्रत्येकी १५ रुपये जुडी होते. शेपू २५ रुपये, तर कोथिंबीर ३० रुपयाला एक जुडी होती.
फलोत्पादनच्या गाड्यावरील भाजीचे दर (प्रती किलो)
कांदा २४ रुपये
बटाटा २४ रुपये
टोमॅटो ३१ रुपये
वालपापडी ८३ रुपये
मिरची ६५ रुपये
भेंडी ४० रुपये
गाजर ३१ रुपये
कोबी १९ रुपये
फ्लॉवर २५ रुपये (नग)