क्रूरता प्रतिबंधक संस्थेतर्फे तक्रार दाखल

म्हापसा : ओर्डा, कांदोळी येथे एका अजगराला जिवंत जाळल्याचा अत्यंत क्रूर प्रकार घडला आहे. या संतापजनक प्रकरणी जिल्हा प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक संस्थेच्या (डिस्ट्रिक्ट सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स) तक्रारीच्या आधारे कळंगुट पोलिसांनी मेहबूब नामक संशयित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा धक्कादायक प्रकार सोमवार, ३० रोजी घडला होता. याचा व्हिडिओ जिल्हा प्राण्यावरील क्रूरता प्रतिबंधक संस्थेला मिळाल्यावर संस्थेचे अधिकारी डॅरील फिन्च यांनी मंगळवारी पोलिसांत तक्रार दिली. ओर्डा कांदोळी येथील एका ठिकाणी संशयित आरोपी अजगराला पकडून त्याला आगीत फेकून जिवंत जाळत असल्याचे दिसत होता.
भारतीय अजगर हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची १ अंतर्गत संरक्षित प्राणी आहे. या प्राण्याला इजा पोहोचवणे किंवा मारणे हा अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा आहे. संशयितावर वन्यजीव संरक्षण कायदा कलम ३२५ आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी फिर्यादीने तक्रारीत केली होती. शिवाय तक्रारीची प्रत उत्तर गोवा उपवन संरक्षकांनाही पाठवली होती.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.