बेकायदेशीर धिरयो झाल्यास जमीन मालकांवर होणार कारवाई

दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st March, 11:49 pm
बेकायदेशीर धिरयो झाल्यास जमीन मालकांवर होणार कारवाई

मडगाव : दक्षिण गोवा जिल्ह्यात होणाऱ्या बेकायदेशीर धिरयोच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धिरयो आयोजन झाल्यास तेथील जमीन मालकावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समन्वय बैठक पार पडली. बैठकीत बेकायदेशीर बैल झुंजी रोखण्यासाठी विविध विभागांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आणि महसूल विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

ज्या खासगी जमिनींवर अशा बैल झुंजींचे आयोजन केले जाते, त्या जमिनींच्या मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. सासष्टी तालुक्यातील मामलेदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा जमिनी आणि त्यांच्या मालकांची सविस्तर माहिती तयार करून ती अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांनी गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करून या बेकायदेशीर कृत्यांना सुरुवातीला रोखण्यावर भर दिला जाणार आहे.

या बैठकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्वरित मदतीसाठी ११२ या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करण्याचा सल्ला मामलेदारांना देण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही अनुचित घटनेच्या वेळी पोलिसांचा प्रतिसाद वेगवान मिळेल आणि सार्वजनिक सुरक्षितता राखली जाईल. बैठकीला जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांच्यासोबत दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे, सासष्टीचे उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक आणि सासष्टी तालुक्यातील मामलेदार उपस्थित होते.

दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारी भागात आणि अंतर्गत गावांमध्ये लपून-छपून होणाऱ्या या बैल झुंजींमुळे प्राण्यांवरील क्रूरतेसोबतच मानवी सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेला हा पवित्रा आयोजकांसाठी इशारा मानला जात आहे. 

हेही वाचा