विवाहाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार प्रकरणी सोहमवर गुन्हा

एकूण गुन्ह्यांची संख्या पाचवर : व्हिडिओ व्हायरल केल्याचाही आरोप


9 mins ago
विवाहाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार प्रकरणी सोहमवर गुन्हा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केला, तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, असे आरोप करून १९ वर्षीय युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, गुन्हा शाखेने संशयित सोहमला दुसऱ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक केली आहे.
या नवीन प्रकरणात १९ वर्षीय युवतीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित सोहम नाईकने जुलै २०२५ ते ९ मार्च २०२६ दरम्यान पीडित युवतीशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. केपे तालुक्यातील एका धबधब्यावर तसेच इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सदर घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते व्हायरल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी संशयित सोहम नाईक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संशयित सोहम याच्याविरोधात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
२२ मार्च रोजी कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीस आले.
कुडचडे पोलिसांनी एका तक्रारीवरून गुन्हा दाखल करून संशयित सोहमला अटक केली.
इतर दोन मुलींनी तक्रार दिल्याने सोमववर पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले.
याच दरम्यान, हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले.
प्रथम गुन्ह्याचा तपास गुन्हा शाखेचे निरीक्षक परेस नाईक यांच्याकडे सोपविण्यात आला होता. निरीक्षक नाईक यांनी संशयिताला शुक्रवारी बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
कोठडी सोमवारी संपल्यामुळे संशयिताला मंगळवारी बाल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सोहमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.
याच दरम्यान १४ वर्षीय मुलीने गुन्हा शाखेत दाखल केलेल्या तक्रारीवरून महिला उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी सोहमवर पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. बाल न्यायालयात संशयिताच्या कोठडीसाठी मंजुरी मिळवली. आता संशयित सोहमला वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सोहमला पोलीस कोठडीसाठी बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.