कार्यकाळ पूर्ण झाल्याने निर्णय : पालिका संचालकांकडून आदेश जारी

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : राज्यातील सहा नगरपालिकांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. याची दखल घेऊन सरकारने डिचोली, कुडचडे-काकोडा, काणकोण, पेडणे, कुंकळ्ळी आणि वाळपई नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. एप्रिल महिन्यात एका, तर उर्वरित नगरपालिकांचा कार्यकाळ २६ मे रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे राज्यातील नगरपालिकांची निवडणूक मे महिन्यात घेतली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात डिचोली, पेडणे, वाळपई, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा, काणकोण, म्हापसा, मुरगाव, मडगाव, सांगे आणि केपे या ११ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी डिचोली, कुडचडे-काकोडा, काणकोण आणि पेडणे या चार नगरपालिकांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी समाप्त झाला. कुंकळ्ळी नगरपालिकेचा ५ एप्रिल रोजी आणि वाळपई नगरपालिकेचा कार्यकाळ ८ एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. याची दखल घेऊन सरकारने सहा नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. अधिकारी अक्षय पोतेकर यांची डिचोली नगरपालिकेचे, सागर गावडे यांची कुडचडे - काकोडा नगरपालिकेचे, शंकर गावकर यांची काणकोण नगरपालिकेचे, श्रीकांत पेडणेकर यांची पेडणे नगरपालिकेचे, विकास कांबळे यांची कुंकळ्ळी, तर राजू देसाई यांची वाळपई नगरपालिकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतचा आदेश नगरपालिका प्रशासनाचे संचालक ब्रिजेश मणरेकर यांनी जारी केला आहे.
दरम्यान, केपे नगरपालिकेचा कार्यकाळ ९ मे रोजी समाप्त होणार आहे. म्हापसा, मुरगाव, मडगाव आणि सांगे नगरपालिकांचा कार्यकाळ २६ मे रोजी समाप्त होणार आहे. फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. सध्या दक्षिण गोव्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ११ नगरपालिकांची निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.
११ नगरपालिकांच्या प्रभाग फेररचनेचा मसुदा जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने ११ नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग फेररचनेची प्रक्रिया सुरू केली असून यासंदर्भातील मसुदा हरकतींसाठी जाहीर केला आहे. नागरिकांना ७ एप्रिलपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
गोवा नगरपालिका कायदा १९६८ मधील कलम ९ आणि १० अंतर्गत प्रभागांची संख्या व मर्यादा निश्चित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या प्रक्रियेत पेडणे, वाळपई, डिचोली, म्हापसा, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे-काकोडे आणि सांगे नगरपालिकांचा समावेश आहे.
संबंधित तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांची मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संबंधित मामलेदारांना साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रभाग फेररचनेचा मसुदा ३१ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मामलेदार किंवा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात मसुदा पाहता येणार आहे. ३ एप्रिल (शासकीय सुट्टी) आणि ५ एप्रिल (रविवार) वगळता इतर दिवशी हरकती सादर करता येतील.
नागरिकांनी प्रभाग फेररचनेच्या मसुद्याचा अभ्यास करून योग्य सूचना व हरकती वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. प्राप्त हरकतींचा विचार करून अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.