दोन महिला कामगारांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद

फोंडा : येथील सराफा बाजारात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून विश्वासाला तडा देणारी ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
फोंडा येथील दामोदर रायकर यांच्या सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी तब्बल १ कोटी १४ लाख ६६ हजार ७८२ रुपयांचे दागिने अफरातफर केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात अंदाजे ६९५.०८० ग्रॅम सोने गायब झाल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात प्रतीक्षा शिंदे (सावईवेरे) व जिया शिगावकर (वाजे - शिरोडा) या दोघींचा समावेश असून, त्या मागील ६-७ वर्षांपासून दुकानात काम करत होत्या.
दुकानातील दागिन्यांमध्ये तफावत आढळल्याने मालकाला संशय आला. तपास केल्यावर हळूहळू मोठ्या प्रमाणात सोने गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तात्काळ फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक मोहन गावडे करत आहेत.
ही घटना केवळ आर्थिक नुकसान नाही, तर अनेक वर्षे निर्माण झालेल्या विश्वासालाही मोठा धक्का देणारी ठरली आहे. घरच्यांसारखे समजून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांकडूनच असा प्रकार घडावा, अशी भावना व्यापारी वर्तुळात व्यक्त होत आहे.