२४ एप्रिलला सुनावणी : विशेष न्यायालयात ११०० पानी आरोपपत्र

पणजी : ड्रग्ज तस्करी प्रकरणातील सराईत संशयित संडे ओने लकी या नायजेरियन नागरिकाने आणि त्याच्या पत्नीने तस्करीतून ९७ लाख रुपये किमतीची मालमत्ता खरेदी केली. तसेच दोघांनी २०१८ पासून २.५१ कोटी रुपये रोख रक्कम बँक खात्यात जमा केली, असा दावा करून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संशयित संडे ओने लकी आणि त्याची पत्नी सुझान उर्फ सुझी वाझ या दोघांविरोधात न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयात (पीएमएलए) ११०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्रात सुमारे १० जणांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) २२ मार्च २०२२ राेजी मोलेभाट साळगाव येथे ड्रग्ज विरोधी कारवाई केली होती. त्यावेळी पथकाने संशयित संडे लकी (४७) याला ताब्यात घेतले. पथकाने त्याच्याकडून ६६ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचा ६४.७१ ग्रॅम एलएसडी व २०.४५ ग्रॅम एमडीएमए हा ड्रग्ज जप्त केला होता. या प्रकरणी एएनसीने त्याच्या विरोधात १६ सप्टेंबर २०२२ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार अवैध ड्रग्ज तस्करीतून मिळवलेल्या संशयित लकी याच्या ९७ लाख रुपये किमतीच्या मालमत्तेचा शोध लावण्यात आला. त्या मालमत्तेमध्ये खोर्ली - जुने गोवा येथील १ फ्लॅट, दोन दुकाने, चार गाड्या व बँक खात्यातील रकमेचा समावेश आहे. ही मालमत्ता ड्रग्ज तस्करीच्या कमाईतून मिळवण्यात आल्यामुळे मुंबई येथील ‘सफेमा’ न्यायालयाने जप्त केली. याच दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली.
खात्यात २.५१ कोटी जमा झाल्याचे समोर
ईडीने वरील मालमत्तांसह संडे ओने लकी याची पत्नी सुझान वाझ हिच्या बँक आॅफ बडोदामध्ये असलेल्या खात्याची तपासणी केली. २०१८ पासून २.५१ कोटी रुपयांची रोख रक्कम खात्यात जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, ईडीने मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.