बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ‘गोवन वार्ता’च्या वृत्तानंतर मदतीचा ओघ

सुनील कृष्णनाथ नाईक यांच्याकडून जबाबदारी घेण्याची तयारी


just now
बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ‘गोवन वार्ता’च्या वृत्तानंतर मदतीचा ओघ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : निधीअभावी बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार होत नसल्याच्या दै. ‘गोवन वार्ता’ने मंगळवार, ३१ रोजी पान १ वर प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर समाजातून मदतीचे हात पुढे येत आहेत. जिल्हा इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षांनीही या प्रकरणी मंत्री दिगंबर कामत यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली. दरम्यान, पालिकेनेही दहा मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा राहिलेली नाही. पालिकेने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया दीड महिन्यांपासून थांबवली आहे. २०२२ पासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेने १५.२१ लाख रुपये खर्च केले आहेत. वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही जिल्हा प्रशासनाकडून पालिकेला हा निधी मिळालेला नाही. निधीअभावी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे थांबले असल्यामुळे शवागारातील कॅबिनेट फुल्ल झाले आहेत.
याबाबतची परिस्थिती दै. ‘गोवन वार्ता’ने मांडल्यानंतर फातोर्डा येथील सुनील कृष्णनाथ नाईक यांनी प्रतिनिधीशी संपर्क साधून पैशाअभावी अंत्यसंस्कार थांबणे योग्य नसल्याची भूमिका मांडून पाच अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या निधीची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. इतर बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी निधी उभारण्यासाठी सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.
मडगाव पालिकेला या प्रश्नावरून सर्व स्तरातून निंदा सहन करावी लागली. इतर गोष्टींसाठी निधी खर्च केला जात असताना याबाबत कार्यवाही का स्थगित ठेवण्यात आली, याबाबत जिल्हास्तरावरून विचारणा झाली. पालिकेने मंगळवारी हिंदू महासभेच्या स्मशानभूमीत दहा मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
शवागाराच्या परिस्थितीबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले, इस्पितळाच्या शवागरात बेवारस मृतदेह असून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मडगाव पालिकेवर आहे. दीड महिन्यापासून काही कारणास्तव अंत्यसंस्कार झालेले नाहीत. ‘गुड फ्रायडे’च्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांकडून अंत्यसंस्कार केले जात नसल्याने काही कॅबिनेट्स उपलब्ध असण्याची गरज भासते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून दोन ते तीन दिवसांत काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
दहा बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मडगाव पालिकेकडे पत्र व आवश्यक रक्कम दिली होती. मात्र पालिकेने रक्कम स्वीकारली नाही.
_ प्रभव नायक, सामाजिक कार्यकर्ते

मडगाव पालिका लोकांकडून कर गोळा करते. ते पैसे कुठे जातात ? मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसतील तर ही आर्थिक व नैतिकही दिवाळखोरी आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे.
_ विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा


इस्पितळाची रुग्णक्षमता व त्यानुसार शवागरातील कॅबिनेटची क्षमता असावी. इस्पितळाच्या कारभाराचे ऑडिट होण्याची गरज आहे.
_ कॅ. विरियातो फर्नांडिस
खासदार