गुन्हा शाखेची कारवाई : ५२,३०० रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने होंडा-सत्तरी येथील अंदर बाहर पत्त्याच्या जुगारावर छापा मारून ९ जणांना अटक केली. याठिकाणाहून ५२ हजार ३०० रुपये रोख रकमेसह इतर जुगार साहित्य जप्त केले. अटक केलेल्या संशयितांची प्रत्येकी पाच हजार रुपये हमीवर सुटका करण्यात आली.
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, होंडा - सत्तरी परिसरात मोठ्या प्रमाणात अंदर बाहर पत्याचा जुगार सुरू असल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक संतोष गोवेकर, हवालदार नित्यानंद हळर्णकर, सुजय वाडकर, कॉ. संदेश वळवईकर, सुभाष गावकर, साईनाथ कोपार्डेकर आणि यशवंत गावकर या पथकाने सोमवारी मध्यरात्री संबंधित ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तिथे अंदर बाहर पत्त्याचा जुगार सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने होंडा - सत्तरी येथील सूर्या गावकर (४०), गुंडू गावकर, मनोहर गावकर (६२), रमेश च्यारी (५४), पांडुरंग गावकर (५०), सुनील गोडयाळकर (२४), सालेली - होंडा येथील गोपाळ गावकर (४३), दिनेश नाईक (४०) आणि राजाराम गावडे (६१, पिसुर्ले) या नऊ जणांना ताब्यात घेतले. तसेच पथकाने त्यांच्याकडून ५२ हजार ३०० रोख रकमेसह इतर जुगार साहित्य जप्त केले.
पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी वरील संशयितांविरोधात गोवा सार्वजनिक जुगार कायद्याचे कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर संशयितांची प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सुटका केली.