म्हापसा बस स्थानकावरील लक्झरी शॉपिंग मॉलला विरोध

व्यापाऱ्यांकडून स्वाक्षरी मोहीम : लोकप्रतिनिधींना देणार निवेदन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st April, 11:38 pm
म्हापसा बस स्थानकावरील लक्झरी शॉपिंग मॉलला विरोध

म्हापसा : येथील कदंब बस स्थानकाच्या १९२ कोटी रुपयांच्या नियोजित भव्य पुनर्विकास प्रकल्पात समावेश असलेल्या लक्झरी शॉपिंग मॉलला स्थानिक व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात व्यापारी वर्गाने स्वाक्षरी मोहीम राबविली.
राज्य सरकार म्हापसा बस स्थानकाचा हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अॅण्ड ट्रान्सफर (डीबीएफओटी) या तत्त्वावर राबवत आहे. २७ हजार चौरस मीटर जागेत होणाऱ्या या प्रकल्पात बस टर्मिनल सोबतच एका प्रशस्त व्यापारी संकुलाचा समावेश करण्यात आला आहे.
दुकानदारांच्या मते, उत्तर गोव्याची आर्थिक वाहिनी म्हापशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या पारंपरिक बाजारपेठेवर आता सरकारने आधुनिकतेच्या नावाखाली संकट उभे केले आहे. कॉर्पोरेट मॉलसमोर छोटा व्यापारी टिकणे कठीण असून हा मॉल कार्यान्वित झाल्यास गेल्या अनेक पिढ्यांपासून या मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या अडीच हजाराहून अधिक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. तसेच या बाजारपेठेचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे.
नव्या बस स्थानकाच्या नावाखाली उभा राहणाऱ्या मॉल प्रकल्पाला १९२ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु मूळ बाजारपेठेमध्ये दुरावस्थेत असलेली गटार व्यवस्था, रस्ते आणि वीज वाहिन्यांवर एक रुपया खर्च केला जात नाही. शिवाय या मॉलमुळे शहरात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडेल, असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.
म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी यांनी सांगितले की, म्हापसा शहराला आज मोठ्या मॉलची गरज नाही, तर पार्किंग आणि कचरा व्यवस्थापनाची आहे. बस स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी पार्किंग आणि इतर सोयी असायला हव्यात, व्यावसायिक मॉल आणून तिथे गर्दी वाढवणे ही पूर्णत: चुकीची योजना आहे.
दरम्यान, या प्रकल्पाला व्यापारी वर्गाने ठाम विरोध करत सह्यांची मोहिम राबवलेली आहे. व्यापारी वर्गाच्या सह्यांसह मॉल प्रकल्पाला विरोध करणारे सविस्तर निवेदन लवकरच सरकार, राजकीय नेते आणि संबंधितांना सादर करण्यात येणार आहे.
व्यापारी वर्गाच्या प्रमुख मागण्या
नियोजित म्हापसा कदंब बस स्थानक प्रकल्पातून शॉपिंग मॉलचा भाग पूर्णपणे वगळा
बस स्थानकाचा वापर हा केवळ प्रवाशांची सोय, पार्किंग व कॅन्टीनसाठीच मर्यादित ठेवा
नव्या प्रकल्पाऐवजी विद्यमान म्हापसा पालिका बाजारपेठेच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करा


म्हापसा बाजारपेठेत आम्ही व्यापारी पिढ्यान पिढ्या व्यवसाय करत आहोत. ऑनलाइन शॉपिंग आणि मॉलमुळे आमचा व्यवसाय अडचणीत आहे. कदंब बस स्थानकावरच मॉल उभा राहिला तर आम्ही स्थानिक छोटे व्यापारी उद्धवस्त होऊ. तसेच बाजारपेठेचे अस्तित्वच कोलमडेल.
- जितेंद्र फळारी, अध्यक्ष, म्हापसा व्यापारी संघटना                

हेही वाचा