विक्रमी नफा मिळवूनही 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'मधील गुंतवणुकीसाठी हिरावून घेतला हजारो कुटुंबांच्या तोंडचा घास

बंगळुरू : जागतिक माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ओरॅकल'ने (Oracle) आपल्या कर्मचारी वर्गावर मोठी कुऱ्हाड चालवत सुमारे २०,००० ते ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. ३१ मार्च २०२६ रोजी झालेली ही कारवाई आयटी क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक घटनांपैकी एक मानली जात आहे. विशेष म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांनी दशकभरापेक्षा जास्त काळ कंपनीसाठी आपले रक्त आटवले, त्यांना पहाटे ६ वाजता एका निनावी ईमेलद्वारे आज तुमचा शेवटचा कामाचा दिवस आहे असे कळवण्यात आले. या निर्णयामुळे जगभरात, विशेषतः भारतात खळबळ उडाली असून, प्रगत तंत्रज्ञान मानवी अस्तित्वासाठी किती घातक ठरू शकते, याचे विदारक चित्र समोर आले आहे.
ओरॅकलने आपल्या एकूण १,६२,००० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १८ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, क्लाउड ऑपरेशन्स, विक्री आणि सायबर सुरक्षा विभागांना मोठा फटका बसला आहे. भारतात या कपातीचा परिणाम सर्वाधिक जाणवत असून, सुमारे १२,००० भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या एका रात्रीत गेल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, एचआर विभागाकडून कोणताही फोन आला नाही किंवा त्यांच्या मॅनेजरशी चर्चा करण्याची संधीही दिली गेली नाही. ईमेल प्राप्त झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यांचा सिस्टीम ॲक्सेस बंद करण्यात आला, यामुळे त्यांना आपले वैयक्तिक दस्तऐवज मिळवणेही कठीण झाले.
या कर्मचारी कपातीमागील तर्क कॉर्पोरेट नफेखोरीवर आधारित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ओरॅकल कंपनी सध्या आर्थिक संकटात नाही; उलट कंपनीने तिसऱ्या तिमाहीत १७.२ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळवला असून त्यांच्या निव्वळ नफ्यात ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे संस्थापक लॅरी एलिसन हे जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असतानाही, ३०,००० कुटुंबांचे भविष्य धोक्यात आणण्यामागे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) हे मुख्य कारण आहे. कंपनीला एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर्स उभारण्यासाठी सुमारे १५६ अब्ज डॉलर्सची गरज आहे. ही प्रचंड गुंतवणूक उभी करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून वर्षाला ८ ते १० अब्ज डॉलर्स वाचवण्याचा घाट कंपनीने घातला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या मानवी हातांमुळे ओरॅकलला इथपर्यंत पोहोचवले, त्याच हातांना एआयसाठी निधी उभारण्याच्या नावाखाली कापले गेले आहे.
सोशल मीडियावर ओरॅकलच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. रेडिट आणि एक्स (X) सारख्या प्लॅटफॉर्मवर कर्मचाऱ्यांच्या व्यथा हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. एका कर्मचाऱ्याने आपल्या मित्राची व्यथा मांडताना सांगितले की, त्याच्या पत्नीची शस्त्रक्रिया मे महिन्यात नियोजित आहे आणि अशा वेळी नोकरी गेल्याने त्याच्यासमोर अंधार पसरला आहे. बंगळुरू येथील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावान कर्मचाऱ्यांना कचऱ्यासारखे बाहेर फेकले गेले आहे. आयबीएम, अॅमेझॉन आणि गुगल पाठोपाठ ओरॅकलनेही त्याच नफेखोरीच्या मार्गाचा अवलंब केला आहे. आधी आम्हाला कोडिंग शिकायला सांगितले, आम्ही ते शिकलो. मग आम्हाला इतर कौशल्ये सुधारण्यास सांगितले, आम्ही ते केले. आणि आता ज्या तंत्रज्ञानाला आम्ही उभे केले, त्यानेच आम्हाला कामावरून काढून टाकले, अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या शाश्वतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपन्यांचा वाढता नफा हा कर्मचाऱ्यांच्या कल्याणाशी जोडलेला नसून, तो केवळ शेअर बाजारातील आकड्यांशी संबंधित आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे. ओरॅकलच्या या निर्णयामुळे शेअर बाजारात त्यांच्या शेअरची किंमत ६ टक्क्यांनी वाढली असली, तरी हजारो कुटुंबांच्या डोळ्यातील अश्रू कोण पुसणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. येत्या काळात इतर कंपन्याही हाच कित्ता गिरवण्याची भीती व्यक्त केली जात असून, एआयचे हे युग मानवी श्रमासाठी वरदान ठरणार की शाप, यावर आता जागतिक स्तरावर मंथन होणे आवश्यक आहे.