बेतुल येथील बेपत्ता व्यक्तीचे प्रकरण; तिन्ही संशयितांना सशर्त जामीन मंजूर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19 mins ago
बेतुल येथील बेपत्ता व्यक्तीचे प्रकरण; तिन्ही संशयितांना सशर्त जामीन मंजूर

मडगाव: बेतुल येथील समुद्रकिनाऱ्यावरून उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. बेपत्ता व्यक्तीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर या तिघांना अटक करण्यात आली होती.

बेतुल येथील साळ नदीच्या मुखाजवळ ७ डिसेंबर २०२५ रोजी सुरजीत सिंग नावाचा युवक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित सोनू कुमार (उत्तर प्रदेश), संजय सिंग आणि अनुज सिंग (दोघेही रा. नवी दिल्ली) यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. संशयितांनी सुरजीतला मद्यधुंद अवस्थेत समुद्रात नेले आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला, असा आरोप पोलिसांनी केला होता.

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, संशयितांविरुद्ध कोणताही थेट पुरावा उपलब्ध नाही आणि हा खटला केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारलेला आहे. तपास आता पूर्णत्वाकडे आला असून संशयितांची कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी नमूद केले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत निरीक्षण नोंदवले की, केवळ गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे म्हणून संशयितांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे हे त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे ठरेल.

न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा वैयक्तिक बाँड आणि तेवढ्याच रकमेचे दोन जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. तसेच, आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सकाळी १० ते १ या वेळेत कुंकळ्ळी पोलीस स्थानकात हजेरी लावणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर न जाणे आणि आपले पासपोर्ट व मोबाईल क्रमांक न्यायालयाकडे जमा करणे, अशा कडक अटी संशयितांवर घालण्यात आल्या आहेत.

हेही वाचा