केंद्रीय योजना डीडीयू २.० अंमलबजावणीत गोवा देशात आघाडीवर : मुख्यमंत्री

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
15 mins ago
केंद्रीय योजना डीडीयू २.० अंमलबजावणीत गोवा देशात आघाडीवर : मुख्यमंत्री

पणजी : केंद्र सरकारच्या डीडीयूजीकेवाय २.० या योजने अंतर्गत राज्यात १२ प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामध्ये १२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पुढील दोन आर्थिक वर्षांत १२ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे ध्येय आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात गोवा (Goa) देशात आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री (Chief Minister)  डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मंगळवारी लोकभवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामीण विकास खात्याचे (Rural Development Department) संचालक डॉ. संतोष तिवारी, प्रेमराज शिरोडकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, डीडीयूजीकेवाय २.० या योजने अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील युवकांना क्षमता विकास आणि रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. योजने नुसार रोजगार संधीचे ध्येय ७० टक्के पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. 

युवा शक्तीचा विकास करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक आहे. मागील काही वर्षांत युवकांसाठी ५०९ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. आर्थिक समस्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेच्या आड येऊ नयेत; हा आमचा हेतू आहे. 

ते म्हणाले, राज्यातील १० आयटीआय मध्ये पारंपारिक अभ्यासक्रमांसह आधुनिक अभ्यासक्रम देखील शिकवले जात आहेत. उद्योग क्षेत्राची गरज पाहून ड्रोन तंत्रज्ञानासह अन्य नवीन अभ्यासक्रम आणण्यात आले आहेत. युवकांनी रोजगार देणारे उद्योजक बनावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

सरकारच्या प्रयत्नांमुळे गोवा कौशल्य विकास क्षेत्रात अग्रेसर होईल अशी आम्हाला खात्री आहे. योजने अंतर्गत गोव्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, वाहन भत्ता, राहण्याचा खर्च, रोजगार संधी दिल्या जात आहेत. कोणताही पात्र युवक मागे राहणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.

हेही वाचा