गोवा विमानतळावर ब्रिटिश नागरिकाकडून बेकायदेशीर सॅटेलाइट फोन जप्त; गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
23 mins ago
गोवा विमानतळावर ब्रिटिश नागरिकाकडून बेकायदेशीर सॅटेलाइट फोन जप्त; गुन्हा दाखल

पणजी :  गोव्यातील (Goa)  मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मोपा) (Mopa)  सुरक्षा (Security) तपासणीदरम्यान एका ब्रिटिश नागरिकाकडून (British citizen)  बेकायदेशीर सॅटेलाइट फोन (Satelllite phone)  जप्त करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सीआयएसएफच्या (CISF) एएसजी युनिटमधील जवान विजय यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी पेडणेतील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. संशयित विल्यम जेम्स बुकॅनन स्मेली (वय ६२, रा. लंडन, युनायटेड किंगडम) हा एअर इंडिया एक्सप्रेसच्या आयएक्स २३६८ (IX 2368)  या मुंबईकडे जाणाऱ्या विमानाने प्रवास करण्याच्या तयारीत होता.

देशांतर्गत सुरक्षा तपासणी (SHA) दरम्यान एटीआरएस-जी (ATRS-G) स्कॅनिंग यंत्रणेत संशयिताच्या हातातील बॅगमध्ये ‘गार्मिन’ कंपनीचा सॅटेलाइट फोन आढळून आला. भारतात अशा प्रकारचे सॅटेलाइट फोन परवानगीशिवाय बाळगणे कायद्याने प्रतिबंधित आहे. तपासणीदरम्यान संशयिताकडे संबंधित सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी किंवा परवाना आढळला नाही.

या प्रकरणी भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा, १९३३ अंतर्गत कलम ३ सह कलम ६(१ए) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  संशयितास बीएनएसएसच्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोपा विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर वझरकर करीत आहेत.