ट्रम्प यांचा इराणच्या ऊर्जा, जलपुरवठा प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा

इराण, इस्त्रायलचे हल्ले-प्रतिहल्ले; तणाव शिगेला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27 mins ago
ट्रम्प यांचा इराणच्या ऊर्जा, जलपुरवठा प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा

तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील युद्ध (Middle East War) सुरू झाल्यास ३२ दिवस झाले आहेत.  परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणच्या ऊर्जा , जलपुरवठा प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा इशारा दिला असताना, तेहरानने अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ऊर्जा पुरवठ्यावर परिणामाची शक्यता 

इराणमधील इसफाहान (Isfahan) येथे नव्या हल्ल्यांनी खळबळ उडाली असून; नुकसानीचा अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नाही. दुसरीकडे, दुबईजवळील बंदर परिसरात कुवेतच्या तेलवाहू जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी दिलेल्या मुलाखतीत इराणच्या संसदाध्यक्ष मोहमद बाघेर कालीबाफ (Mohammad Bagher Qalibaf ) यांच्याशी संपर्क असल्याचा दावा केला. मात्र, कालीबाफ यांनी हा दावा फेटाळून लावत कोणतीही थेट चर्चा सुरू नसल्याचे सांगितले. पाकिस्तानमार्फत चर्चा सुरू असल्याच्या बातम्यांनाही त्यांनी नाकारले.

इराण, इस्त्रायलचे हल्ले-प्रतिहल्ले

दरम्यान, जेरुसलेम (Jerusalem)  परिसरात किमान १० स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायलने आपल्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली कारवाया सुरू असून, हिझ्बुल्लाला लक्ष्य करताना संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसैनिकांसह नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

युद्धाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम 

या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. झेक रिपब्लीकने (Czech Republic) आपल्या साठ्यातून १ लाख मेट्रिक टन तेल बाजारात सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तर अमेरिकेत पेट्रोलच्या किमती वाढत आहेत.

तेहरामध्ये युद्धाचा सामान्य जनतेवर परिणाम 

तेहरानमधील नागरिक सध्या कडक सुरक्षा, वीज खंडित होणे आणि इंटरनेट बंदी यांचा सामना करत आहेत, ज्यामुळे युद्धाचा सामान्य जनतेवर मोठा परिणाम दिसून येत आहे.

युद्ध संपवण्याची डोनाल्ड ट्रम्पची तयारी 

याच दरम्यान, ‘द वॉल स्ट्रिट जरनलच्या  (The Wall Street Journal) च्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांना इराणमधील युद्ध संपवण्याची तयारी दर्शवली आहे.  जरी होर्मुझ सामुद्रधुनी ( Strait of Hormuz)  पूर्णपणे खुली न झाल्यासही या मार्गावर जबरदस्तीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध अधिक काळ लांबण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. सध्या या संघर्षात लष्करी आणि राजनैतिक घडामोडी वेगाने बदलत असून; पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणते वळण घेईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा