नितीश कुमारांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा; अजून मुख्यमंत्रीपदी

सहा महिने मुख्यमंत्रीपदी राहू शकतात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
25 mins ago
नितीश कुमारांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा; अजून मुख्यमंत्रीपदी

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राज्याच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. विधानपरिषद अध्यक्ष अवधेश नारायण सिंग (Awadhesh Narayan Singh यांनी सोमवारी (३० मार्च २०२६) ही माहिती दिली.

जनता दल (युनायटेड)चे आमदार संजय गांधी  (Sanjay Gandhi ) यांनी नितीश कुमार यांचा राजीनामा विधानपरिषदेत सादर केला. दरम्यान, नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांची १६ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत राज्यसभेसाठी निवड झाली होती. नियमानुसार, संसद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत राज्य विधानमंडळातील पदाचा राजीनामा देणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुदतीतच आपला राजीनामा सादर केला.

यापूर्वी २७ मार्च रोजी बिहार विधानसभेचे अध्यक्ष (Prem Kumar) यांनी नितीश कुमार यांना ३० मार्चपर्यंत राजीनामा देण्यासाठी मुदत असल्याचे स्पष्ट केले होते.

राजीनाम्याच्या पूर्वसंध्येला पाटण्यातील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जनता दल (यू) पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. काही नेत्यांनी नितीश कुमार यांनी बिहारमध्येच रहावे, अशी मागणी केली होती, तर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याचे दिसून आले.

नितीश कुमार यांनी ५ मार्च रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी  अर्ज दाखल केला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)  उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या तब्बल २० वर्षांच्या बिहारमधील नेतृत्वाचा अंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बिहारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार ( Sharwan Kumar)  यांनी सांगितले होते की, जरी त्यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकली असली तरी, संविधानातील तरतुदीनुसार नितीश कुमार पुढील सहा महिन्यांपर्यंत मुख्यमंत्री पदावर कायम राहू शकतात.  

हेही वाचा