अशोक खरातचा कोट्यवधींचा जमीन घोटाळा उघड; प्रकल्पाआधीच खरेदी : ‘इनसाइडर’चा संशय

काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा संशय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
अशोक खरातचा कोट्यवधींचा जमीन घोटाळा उघड; प्रकल्पाआधीच खरेदी : ‘इनसाइडर’चा संशय

नाशिक : भोंदू बाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात (Ashok Kharat)  याच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश होत आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीपलीकडे जाऊन खरातने जमीन व्यवहारांत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट होत आहे. 

एसआयटीच्या (SIT)  तपासात उघड झाल्यानुसार, नाशिक शहरातील (Nashik city)  प्रस्तावित रिंगरोड (Ring road)  प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच खरातने त्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या होत्या. विशेष म्हणजे काही ठिकाणी या जमिनी ३ ते ५ पट अधिक दराने विकत घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महसूल विभागातील (Revenue Department) ‘इनसाइडर’कडून (Insider)  आधीच माहिती मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या व्यवहारांमध्ये काळा पैसा पांढरा करण्याचा मोठा खेळ झाल्याची शक्यता असून, काही अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचा देखील सहभाग असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अनेक गट नंबरवर अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर जमिनी नोंदवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात गुंतवणूकदार कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.

शिर्डी जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा 

दरम्यान, शिर्डी येथील चार एकर जमीन व्यवहार प्रकरणातही खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ जमीनमालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, फसवणूक आणि सावकारकी कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. या प्रकरणात मध्यस्थी करणारे अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कर्ज देऊन जमीन बळकावल्याचा आरोप 

फिर्यादीत कर्ज देऊन जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात खरातची पत्नी कल्पना खरात हिचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. 

८ ते १० जणांची चौकशी 

शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी ८ ते १० जणांची तब्बल १२ तासांहून अधिक वेळ चौकशी केली आहे. दरम्यान, ‘इनसाइड’ माहिती पुरवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.


हेही वाचा