गोवन वार्ताच्या वृत्ताची दखल; इतर बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी निधी उभारणार

मडगाव : निधीअभावी बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार होत नसल्याच्या गोवन वार्ताच्या वृत्तानंतर समाजातून मदतीचे हात पुढे येत आहेत. फातोर्डा (Fatorda) येथील सुनील कृष्णनाथ नाईक यांच्याकडून पाच मृतदेहाच्या निधीची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवतानाच आणखी निधी जमा करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
मडगाव (Margao) येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील (South Goa District Hospital) शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा उरलेली नाही. मडगाव पालिकेकडून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया मागील दीड महिन्यांपासून थांबवण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) पालिकेला (Muncipality) २०२२ पासून आतापर्यंत ज्या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले त्यावर खर्च करण्यात आलेला १५.२१ लाखांचा परतावा निधी अद्यापही मिळालेला नाही.
यासाठी पालिकेकडून जिल्हा प्रशासनाला वारंवार स्मरणपत्रही पाठवण्यात आलेली आहेत. या कारणास्तव आता बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात नसल्याने शवागारातील कॅबिनेट रिक्त राहिलेले नाहीत. याबाबत गोवन वार्ताकडून समाजासमोर सत्य मांडण्यात आल्यानंतर फातोर्डा येथील सुनील कृष्णनाथ नाईक यांनी प्रतिनिधीशी संपर्क साधत पैशाअभावी कुणाचे अंत्यसंस्कार थांबणे योग्य नसल्याची भूमिका मांडत यातील पाच मृतदेहांच्या निधीची जबाबदारी आपण घेण्याची तयारी दर्शवली.
तसेच इतर बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी निधी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल; असे स्पष्ट केले. या प्रकरणात आता जिल्हा प्रशासनाच्या भूमिका महत्वाची ठरणार आहे.