गोव्यात दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
12 mins ago
गोव्यात दोन दिवस पावसाचा  ‘यलो अलर्ट’

पणजी : कर्नाटक (Karnataka) आणि महाराष्ट्र (Maharshtra)  दरम्यान तयार झालेले टर्फ  व अन्य वातावरणातील बदलांमुळे राज्यात ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यानुसार आज आणि उद्या वादळी (Cyclone0  पावसाचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert)  जारी करण्यात आला आहे. तर २ एप्रिल रोजी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. ३ ते ६ एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम असल्याने उकाडा कायम होता. पणजीत कमाल ३४ अंश तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव मधील कमाल तापमान ३३.६ अंश व किमान तापमान २५.२ अंश सेल्सिअस राहीले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात उकाड्याचे प्रमाण कमी होते. मागील वर्षी मार्च महिन्यात १० हून अधिक दिवस उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. यंदा सत्तरी तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली. खात्याने एप्रिल आणि मे मध्ये गोव्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यादरम्यान राज्यात सरासरी एवढा किंवा त्याहून किंचित कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.