गोव्यात जनगणनेचा पहिला टप्पा उद्यापासून सुरू

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
20 mins ago
गोव्यात जनगणनेचा पहिला टप्पा उद्यापासून सुरू

पणजी : गोव्यात (Goa) जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते १५ मे दरम्यान होणार आहे. पहिल्या टप्प्यात गृह गणना करण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १५ एप्रिल दरम्यान नागरिकांना जनगणना पोर्टलवरून (Portal)  स्वयंनोंदणी करता येईल. तर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती जमा करण्याचे काम १६ एप्रिल ते १५ मे दरम्यान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ९ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान प्रत्यक्ष जनगणना होणार असल्याची माहिती जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका चेष्टा यादव यांनी दिली.

 मंगळवारी पर्वरी (Porvorim)  येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विजय सक्सेना, श्वेता नंदवाना उपस्थित होते.  यादव यांनी सांगितले की, दुसरा टप्पा देशात सर्वत्र एकत्रित रित्या घेण्यात येणार आहे. जनगणनेसाठी (Population census)  ४२२ निरीक्षक आणि २४६७ असे एकूण ३०८६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांचा समावेश आहे.

निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना दोन्ही टप्प्यासाठी २५ हजार रुपये वेतन दिले जाईल. यंदा प्रथमच डिजिटल (Digital) पद्धतीने जनगणना होणार आहे. जनगणना कर्मचारी मोबाईल पद्वारे (App) माहिती जमा करणार आहेत. यासाठी त्यांना स्वतःचा मोबाईल वापरावा लागणार आहे. निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा सीएनएमएस पोर्टलद्वारे (CNMS Portal)  घेण्यात येणार आहे. 

जनगणनेमध्ये ३३ पद्धतीचे प्रश्न

जनगणनेमध्ये ३३ पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यामध्ये घर क्रमांक, इमारत क्रमांक, घराची स्थिती, खोल्यांची संख्या, छप्पर, फरशीसाठी वापरलेले साहित्य, घरातील पिण्याचे पाणी, वीज, सांडपाणी निचरा, एलपीजी जोडणी , जेवणात वापरले जाणारे मुख्य धान्य, घरात राहणाऱ्या विवाहित जोडप्यांची संख्या, मोबाईल, टीव्ही, स्मार्ट फोन, संगणक, लॅपटॉप, चारचाकी, दुचाकी आदींची माहिती जमा करण्यात येणार आहे. जनगणना ही कायद्यानुसार होत असल्याने जनगणना कर्मचाऱ्यांना घरात प्रवेश देणे, योग्य माहिती देणे, त्यांना घरावर क्रमांक लिहू देणे कायद्याने बंधनकारक आहे. 

८ वी जनगणना 

भारताला (India)  स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही ८ वी जनगणना आहे. गोव्यात (Goa)  जनगणनेसाठी ३ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी ३ मुख्य जनगणना अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच २६ उप जिल्हाधिकारी, मामलेदार चार्ज अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. निरीक्षक आणि जनगणना कर्मचाऱ्यांना दोन राष्ट्रीय पातळीवरील अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत.

याशिवाय गोव्यात ६ मास्टर तर ५० फील्ड प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सरकारी धोरणे ठरवणे, मतदार संघ फेररचना, आरक्षण आदी अनेक गोष्टींसाठी जनगणना आवश्यक असते. यामुळे गोव्यातील सर्व नागरिकांनी या प्रक्रियेमध्ये सहकार्य करावे असे आवाहन चेष्टा यादव यांनी केले. 

अशी असेल स्वयंनोंदणी प्रक्रिया 

राज्यात स्वयंनोंदणी प्रक्रिया १ ते १५ एप्रिल दरम्यान होणार आहे. यासाठी जनगणना पोर्टलवर जाऊन माहिती भरावी लागेल. यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या मोबाईलवर ११ अंकी आयडी पाठवण्यात येईल. जनगणना कर्मचारी घरी आल्यावर त्यांना हा आयडी दाखवावा लागेल. माहितीची पडताळणी झाल्यावर ती अपलोड केली जाईल. या पोर्टलवर कोकणी सह अन्य  १६ भाषा वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.