प्रमुख मंदिरांची रेकी

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली (Delhi) मोठा दहशतवादी (Terrorist) कट उधळण्यात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला (Delhi Police Special cell) यश आले आहे. पाकिस्तानस्थित (Pakistan) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर हा धक्कादायक कट उघडकीस आला.
संशयिताची रेकी केल्याची कबुली
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव शब्बीर अहमद लोन असून, चौकशीदरम्यान त्याने राजधानीतील महत्त्वाच्या धार्मिक व गर्दीच्या ठिकाणांची रेकी (पाहणी) केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लोनने या ठिकाणांचे व्हिडिओ शूट करून ते पाकिस्तानमधील हँडलर्सना पाठवले होते.
या मंदिरांची रेकी
रेकी करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये कालकाजी मंदिर, लोट्स टेंपल आणि छतरपूर मंदिर यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, राजधानीतील अत्यंत वर्दळीचे व्यापारी केंद्र असलेल्या कनॉट प्लेस परिसरातही संशयित हालचाली केल्याचे उघड झाले आहे.
तपास यंत्रणांच्या मते, या कटामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयची भूमिका असण्याची शक्यता आहे. तसेच, बांगलादेशात “द रेसिस्टन्स फ्रंट”च्या धर्तीवर नवीन दहशतवादी संघटना उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे प्रादेशिक सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवली
या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, संशयित नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे.