बाल न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पणजी : कुडचडे (Curhorem) लैंगिक शोषणप्रकरणी संशयित सोहम नाईक (Suspect Soham Naik) याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यांची संख्या आता ५ झाली आहे.
लैंगिक शोषणप्रकरणी संशयित सोहम नाईक सध्या क्राईम ब्रॅंचच्या (Crime branch) कोठडीत आहे. मंगळवारी त्याला बाल न्यायालयात उपस्थित करण्यात आले. बाल न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध दाखल झालेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींवरून त्याच्याविरुद्ध पाच गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. लैंगिक शोषणाच्या तक्रारी केलेल्यांत अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
प्रथम मुलींशी मैत्री करून व जवळीक करून नंतर लग्नाचे आमिष दाखवून अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित सोहम नाईक याला अटक करण्यात आली आहे. संशयिताने आपण काही मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडीओ बनवले असल्याचे काही मित्रांना सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर कुडचडेसहीत गोव्यात एकच खळबळ माजली होती.
प्रकरण बाहेर येताच कुडचडेतील स्थानिक व काही नगरसेवकांनी याप्रकरणातील आरोपीला अटक करावी व गुन्हा नोंदवून चौकशी करावी, यामागणीसाठी कुडचडे पोलीस (Curchorem Police) स्थानकावर मोर्चा नेला होता. आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कुडचडे पोलिसांनी संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली होती. त्यानंतर प्रकरण तपासासाठी क्राईम ब्रॅंचकडे सोपवण्यात आले आहे.