अवघ्या २४ व्या वर्षी साईजल बनली सरपंच!

पिळर्ण-मार्रा पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st March, 11:27 pm
अवघ्या २४ व्या वर्षी साईजल बनली सरपंच!

पिळर्ण-मार्रा सरपंचपदी निवड झाल्याबद्दल साईजल बांदोडकर यांचे अभिनंदन करताना पंचायत मंडळ.

म्हापसा : पिळर्ण-मार्रा पंचायतीच्या सरपंचपदी २४ वर्षीय साईजल संदीप बांदोडकर हिची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यातील सर्वात तरुण सरपंचांच्या यादीमध्ये साईजल हिची वर्णी लागली आहे. जिल्हा पंचायत सदस्य पदाच्या निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे रेश्मा बांदोडकर यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यापासून हे पद रिक्त होते.
मंगळवारी ३१ रोजी सकाळी या रिक्त पदाच्या निवडीसाठी पंचायत मंडळाची विशेष बैठक झाली. यावेळी अमरनाथ गोवेकर, सुवर्णसिंग राणे, अंकिता नाईक, अश्विनी गोवेकर, अक्षय गोवेकर, संतोष बांदोडकर व साईजल बांदोडकर हे पंच सदस्य उपस्थित होते. तर सोनल मालवणकर व रूपेश नाईक हे दोघे पंच सदस्य अनुपस्थित होते.
सरपंचपदासाठी साईजल बांदोडकर यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांची यापदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी खुशाली हळर्णकर यांनी कामकाज हाताळले. त्यांना पंचायत सचिव केशव फडते यांनी सहकार्य केले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंचायत प्रभाग १ मधील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने साईजल या प्रथमच पंच सदस्यपदी निवडून आल्या होत्या. आई रेश्मा बांदोडकर या जिल्हा पंचायत निवडणुकीत उतरल्यामुळे त्यांनी सरपंच तसेच पंच सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.
बांदोडकर परिवाराची राजकीय घोडदौड
सरपंच साईजल बांदोडकर या पदवीधर असून त्यांच्या आई रेश्मा बांदोडकर या विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य तर वडील संदीप बांदोडकर हे माजी जिल्हा पंचायत सदस्य आहेत. तसेच बांदोडकर दाम्पत्याने पिळर्ण-मार्रा पंचायतीचे सरपंचपद भूषवलेले आहे. भाजपचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची साळगाव मतदारसंघात ओळख आहे.      

हेही वाचा