स्वयंरोजगाराच्या मासिक कमाईत गोवा अव्वल

केंद्रीय अहवाल : महिन्याची कमाई सरासरी ३९,६२२ रुपये : मिझाेरम दुसऱ्या क्रमांकावर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st March, 11:31 pm
स्वयंरोजगाराच्या मासिक कमाईत गोवा अव्वल

पणजी : राज्यातील स्वयंरोजगारधारकांना त्यांच्या व्यवसायातून मिळणारी सरासरी मासिक कमाई देशात सर्वाधिक आहे. केंद्रीय नियोजन आणि सांख्यिकी खात्यातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालातून (पीएलएफएस) ही माहिती मिळाली आहे. गोव्यात स्वयंरोजगारधारकांची महिन्याची कमाई ३९,६२२ रुपये इतकी आहे. याची राष्ट्रीय सरासरी १४,६६१ रुपये आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मिझोरम (२२,९९८ रु.) तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र (२२,१४० रु.) ही राज्ये आहेत.
खात्यातर्फे जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्वयंरोजगार असणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. अहवालानुसार गोव्यात स्वयंरोजगार धारक पुरुषांच्या तुलनेत महिलांची कमाई कमी आहे. पुरुषांना महिन्याला सरासरी ४२,९६९ रुपये, तर महिलांची २४,४८० रुपये कमाई होते. ग्रामीण भागात पुरुषांची ३१,८७५ रु. तर महिलांची १८,१०६ रुपये हजार सरासरी कमाई होते. शहरात पुरुषांची कमाई ४७,९११ रु. तर महिलांची २९,३३१ रु. रुपये होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
सर्वाधिक कमाई मिळण्याच्या यादीत महाराष्ट्रानंतर हरियाणाचा क्रमांक लागतो. तिथे स्वयंरोजगारधारकांची महिन्याची सरासरी कमाई २१,३९३ रुपये आहे. यानंतर पंजाबमध्ये १९,९२७ रु., कर्नाटकमध्ये १९,००५ रु., तेलंगणात १८,८९८ रु. मासिक कमाई होते. केंद्र शासित प्रदेशात दिल्लीमध्ये ३४,६३५ रु. तर अंदमानमध्ये ३०,७७८ रु. कमाई होते. देशात नागालँड (७,६८६ रु.), ओडिशा (९,८११ रु.), आसाम (१०,९३० रु.) या राज्यात स्वयंरोजगारातून होणारी मासिक कमाई तुलनेने कमी आहे.
५७ टक्के करतात नोकरी
अहवालानुसार, राज्यातील ५७.६ टक्के लोक नियमित पगाराची नोकरी करतात. ३३.२ टक्के लोक स्वयंरोजगारधारक आहेत. तर ९.२ टक्के लोक कामगार आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्या एकूण लोकांपैकी २८ टक्के लोकांनी अन्य लोकांना नोकरी दिली आहे.

हेही वाचा