संशयित गेल्या तीन वर्षांपासून होता तुरुंगात

मडगाव: वेर्णा येथील एका खून प्रकरणातील संशयित ताहिर हुसेन मुल्ला (२७) याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांचा अभाव आणि केवळ संशयाच्या आधारे गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निकाल दिला.
दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम एस. प्रभू देसाई यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. पोलिसांनी ठेवलेल्या आरोपानुसार, ८ डिसेंबर २०२१ रोजी वेर्णा येथील टायटन जंक्शनजवळील सबवेमध्ये ताहिरने संजीव भोजगर यांना मारहाण केली होती. या मारहाणीमुळे संजीव पायऱ्यांवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी ताहिरने मृतदेह प्लास्टिकच्या बॅनरने झाकून ठेवला आणि संजीव यांचा मोबाईल नष्ट केला, असा दावा पोलिसांनी केला होता.
सुनावणीदरम्यान पोलिसांनी असा युक्तिवाद केला की, संशयिताने हवालदार आझाद यांच्यासमोर गुन्ह्याची कबुली दिली होती. मात्र, न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. एखादी व्यक्ती गुन्हा केल्यानंतर सात तास घटनास्थळी थांबून एका अनोळखी पोलिसासमोर कबुली देणे हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे, असे न्यायालयाने नमूद केले. याशिवाय, संशयिताच्या कपड्यांवर किंवा शरीरावर रक्ताचे डाग अथवा झटापटीच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. सबवेमध्ये सापडलेले सिमकार्ड संशयिताशी जोडणारा कोणताही ठोस पुरावा पोलीस सादर करू शकले नाहीत. तसेच, हा गुन्हा करण्यामागे ताहिरचा नेमका हेतू काय होता, हेदेखील सिद्ध झाले नाही.
संशयित ताहिर हुसेन मुल्ला हा मागील ३ वर्षे, ३ महिने आणि १४ दिवसांपासून तुरुंगात होता. न्यायालयाने अखेर त्याला सर्व आरोपांतून मुक्त केले. या प्रकरणात संशयितातर्फे अॅड. के. व्हिएगस यांनी युक्तिवाद केला, तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील जे. ठक्कर यांनी बाजू मांडली.