कोविडच्या ‘सिकाडा’चा अमेरिकेच्या २५ राज्यांत फैलाव; भारतात धोका आहे का?

२० पेक्षा जास्त देशांमध्ये फैलाव

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10 mins ago
कोविडच्या ‘सिकाडा’चा अमेरिकेच्या २५ राज्यांत फैलाव; भारतात धोका आहे का?

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोविड-१९च्या नव्या उपप्रकाराचा बीए.३.२ ( BA.3.2)  (सिकाडा) वेगाने पसरत असून; आतापर्यंत २५ राज्यांमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला आहे. जागतीक आरोग्य संघटनेने (World Health Organization (WHO))  या व्हेरिएंटला निरीक्षणाखाली असलेला प्रकार (Variant Under Monitoring) म्हणून वर्गीकृत केले आहे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारतात या व्हेरिएंटमुळे संसर्गात कोणतीही मोठी वाढ झाल्याचा अहवाल नाही. सध्या, २० पेक्षा जास्त देशांमध्ये सिकाडाचा फैलाव आहे. 

‘सिकाडा’ व्हेरिएंट नेमका काय आहे?

बीए.३.२ हा ओमिक्रॉन कुटुंबातील एक सब-व्हेरिएंट असून; २०२४ उत्तरार्धात दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळला. या व्हेरिएंटमध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये तब्बल ७० ते ७५ म्युटेशन्स आहेत. जे मूळ ओमिक्रॉनपेक्षा अधिक आहेत. मात्र, यामुळे आजार अधिक गंभीर होतो, असे ठोस पुरावे सध्या उपलब्ध नाहीत.

लक्षणे कशी आहेत?

सिकाडा (Cicada) व्हेरिएंटची लक्षणे ओमिक्रॉनसारखीच असून; प्रामुख्याने श्वसनमार्गावर परिणाम करतात.

घसा खवखवणे

ताप, थंडी वाजणे

खोकला, थकवा

डोकेदुखी, नाक बंद होणे

काही रुग्णांमध्ये मळमळ, उलट्या, जुलाब किंवा चव-वास जाणे यांसारखी लक्षणेही दिसू शकतात.

इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळेपण काय?

या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणावर म्युटेशन्स असल्यामुळे पूर्वीची संसर्ग किंवा लस घेतल्यावर मिळालेल्या प्रतिकारशक्तीपासून काही प्रमाणात बचाव करण्याची क्षमता असू शकते. तरीही तो ओमिक्रॉन कुटुंबातीलच असल्याने काही जनुकीय साम्य कायम आहे.

लसीकरण प्रभावी आहे का?

तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या लसींचा प्रभाव काहीसा कमी होऊ शकतो, तरीही गंभीर आजार आणि मृत्यू टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे लसीकरण सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतासाठी किती धोका ?

जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO)  माहितीनुसार, बीए.३.२चा प्रसार इतर वेगाने वाढणाऱ्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत कमी आहे आणि तो अद्याप दुर्मिळ आहे. भारतात या व्हेरिएंटमुळे संसर्गात कोणतीही मोठी वाढ झाल्याचे अहवाल नाहीत.

खबरदारी घेणे आवश्यक 

सध्या ‘सिकाडा’ व्हेरिएंटबाबत घाबरण्याचे कारण नसले, तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांकडून यावर लक्ष ठेवले जात असून, बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळत आहेत.


हेही वाचा