जेट इंधन २ लाखांच्या पार

नवी दिल्ली : देशात प्रीमियम इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली असून; वाहनधारक आणि विमान वाहतूक क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. इंडियन ऑइलने (Indian Oil) आपल्या प्रीमियम एक्सपी१०० पेट्रोलच्या लक्षणीय वाढ करत १४९ रुपयांवरून थेट १६० रुपये प्रती लिटर केले आहे.
उच्च श्रेणीतील वाहनांना वापर
एक्सपी१०० हे देशातील पहिले १००-ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल (Premium Petrol) असून ते प्रामुख्याने उच्च श्रेणीतील लक्झरी कार आणि सुपरबाईकसाठी वापरले जाते. याशिवाय क्सॅत्रा ग्रीन (Xtra Green) प्रीमियम डिझेलचाही (Premium Diesel) दर ९१.४९ रुपयांवरून वाढून ९२.९९ रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे.
अमेरिका-इराण संघर्षामुळे परिणाम
दरवाढी मागचे नेमके कारण अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले तरी जागतीक कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, तसेच अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
एलपीजी मध्ये २०२६ मधील पाचवी वाढ
दरम्यान, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. १९ किलोच्या सिलींडरची किंमत १ मार्चला १,७६८.५० रुपये होती, ती आता १ एप्रिलपर्यंत वाढून २,०७८.५० रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या एका महिन्यातील ही तिसरी दरवाढ असून २०२६ सालातील पाचवी वाढ ठरली आहे.
विमान इंधन दरात वाढ
याचबरोबर विमान इंधन (ATF) दरातही अभूतपूर्व वाढ झाली आहे. एटीएफचा दर प्रथमच २ लाख रुपये प्रती किलोलीटरच्या पुढे गेला असून; दिल्लीत तो २,०७,३४१ रुपये प्रती किलोलीटर इतका झाला आहे. याआधी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन संघर्षाच्या काळात हा दर सुमारे १.१ लाखांपर्यंत गेला होता.
सामान्य नागरिकांना सरकारकडून दिलासा
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने २७ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लिटर १० रुपयांची कपात केली होती. यामुळे सामान्य इंधनाचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
एकूणच, जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत आहे. आगामी काळातही दरवाढीचा दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, व्यावसायिक डिझेलच्या किंमती वाढल्याने त्याचा फटका गोव्यातील मच्छीमारी ट्रॉलर, कदंब बसगाड्या यांना बसला आहे.