युद्धाचा फटका; व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात मोठी वाढ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 mins ago
युद्धाचा फटका; व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा थेट परिणाम भारतातील एलपीजी दरांवर झाला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. राज्यातील तेल कंपन्यांनी बुधवारी १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरात तब्बल  १९५.५० रुपये पर्यंत वाढ जाहीर केली आहे. 

१९५.५० रुपये ते २१८ रुपये पर्यंत वाढ 

दर वाढीनंतर दिल्लीत १९ किलो सिलिंडरची किंमत २,०७८.५० रुपयांवर पोहोचली असून, मुंबईत ती २,०३१ रुपये इतकी झाली आहे.  कोलकाता आणि चेन्नईमध्ये अनुक्रमे २१८ रुपये आणि २०३ रुपये इतकी वाढून नवीन दर २,२०८ रुपये आणि २,२४६ रुपये इतकी झाली आहे. याशिवाय ५ किलोच्या मिनी सिल‌िंडरच्या दरात ५१ रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. 

युद्धामुळे दर वाढ 

 ही दरवाढ प्रामुख्याने पश्चिम आशियातील संघर्षामुळे झाली आहे. या युद्धामुळे महत्त्वाच्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’तील वाहतूक प्रभावित झाली असून,  जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतीत सुमारे ५० टक्के एवढी वाढ झाली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन भारतातील सरकारी तेल कंपन्यांना दरवाढ करावी लागली. 

हॉटेल, रेस्टॉरंट्स, उद्योग क्षेत्राला फटका 

या निर्णयाचा सर्वाधिक फटका हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि उद्योग क्षेत्राला बसणार आहे. मात्र, घरगुती ग्राहकांना सध्या दिलासा मिळाला असून,  १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९१३ रुपये एवढा स्थिर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी ६० रुपये एवढी वाढ करण्यात आली होती. 

पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये बदल नाही 

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत पेट्रोल ९४.७२ प्रती लिटर तर डिझेल ८७.६२ प्रती लिटर  दरानेच विक्री होत आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि चलन विनिमय दरांचा विचार करून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ( Indian Oil Corporation), भारत पेट्रोलियम ( Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोल‌ियम ( Hindustan Petroleum) या सरकारी तेल कंपन्या एलपीजीचे दर निश्चित करतात.

हेही वाचा