इराणमध्ये सत्तासंघर्ष तीव्र; युद्ध समाप्तीच्या हालचालींना वेग

दोन ते तीन आठवड्यांत सैन्य मागे घेऊ : अमेरिका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27 mins ago
इराणमध्ये सत्तासंघर्ष तीव्र; युद्ध समाप्तीच्या हालचालींना वेग

तेहरान : मध्यपूर्वेत (Middle East) सुरू असलेल्या इराण युद्धात नवे वळण आले असून; इराणच्या सत्ताकेंद्रावर लष्करी प्रभाव वाढल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी IRGC) यांनी प्रत्यक्षात सरकारवरील नियंत्रण मजबूत केल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपतीचे निर्णय आणि नियुक्त्यांवरही त्यांचा प्रभाव वाढल्याचे सांगितले जात आहे.

 राजधानी तेहरानसह विविध भागांवर हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे.

उद्दिष्ट साध्य : अमेरिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी इराणविरोधातील कारवाईत आपले मुख्य उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. “इराणकडे अण्वस्त्रे राहणार नाहीत, हेच आमचे लक्ष्य होते आणि ते साध्य झाले,” असे त्यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकन सैन्य माघारी येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हाइट हाऊसकडून ट्रम्प राष्ट्राला संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली असून, युद्धाबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

युद्ध समाप्ती ‘लवकरच’

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबीओ (Marco Rubio) यांनीही युद्ध समाप्ती जवळ आल्याचे संकेत दिले. “आज किंवा उद्या नाही, पण युद्धाचा शेवट लवकरच होणार,” असे त्यांनी म्हटले.

भविष्यातील हल्ल्यांविरोधात ठोस हमीची मागणी : इराण 

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान ( Masoud Pezeshkian)  यांनी युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली असली तरी भविष्यातील हल्ल्यांविरोधात ठोस हमीची मागणी केली आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आंतोनिओ (Antonio Costa) यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना त्यांनी तातडीच्या युद्धविरामाची गरज अधोरेखित केली.

इराण कमकुवत : इस्रायल

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी अमेरिका-इस्रायल संयुक्त कारवाईमुळे इराणची शक्ती मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा दावा केला. “इराणचे सरकार लवकरच कोसळेल,” असे ते म्हणाले.

समुद्रात तणाव; टँकरवर हल्ला

कतारजवळील समुद्रात एका तेलवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्राने हल्ला झाल्याची माहिती यूकेच्या सागरी संस्थेने दिली आहे. सुदैवाने जहाजावरील कर्मचारी सुरक्षित असून पर्यावरणीय हानी टळली आहे.

तेल दरात उसळी

या संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारावरही दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रती बॅरल १०४ डॉलरच्या पुढे गेला असून, अमेरिकन क्रूडही १०२ डॉलरच्या आसपास पोहोचले आहे.

आयआरजीसीचे हल्ले तीव्र

आयआरजीसीने (IRGC)  अमेरिकन व इस्रायली लक्ष्यांवर जोरदार हल्ले केल्याचा दावा केला आहे. पर्शियन गल्फमध्ये इस्रायली कंटेनर जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याचे तसेच यूएई किनाऱ्यावर अमेरिकन ठिकाणांवर ड्रोन हल्ले केल्याचे सांगितले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीवरून वाद

ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेबाबत इतर देशांवर जबाबदारी टाकत “प्रत्येक देशाने स्वतःचे तेल स्वतःच सुरक्षित ठेवावे,” असा इशारा दिला.

युद्ध निर्णायक टप्प्यात 

एकूणच इराण युद्ध निर्णायक टप्प्यात पोहोचले असून, राजकीय, लष्करी आणि आर्थिक स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी काही दिवसांत युद्धविरामाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा