अशोक खरातची पत्नी फरार, मुलगा ताब्यात; मुलासमोर होणार चौकशी

नाशिक लैंगिक शोषण प्रकरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 mins ago
अशोक खरातची पत्नी फरार, मुलगा ताब्यात; मुलासमोर होणार चौकशी

नाशिक : भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat)  प्रकरणात काल रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटी पथक खरातच्या घरी पोहोचण्या आधीच त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाली. मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात (Nashik District Court)  हजर केले जाणार असून; त्याची पोलीस कोठडी संपत आहे. यापूर्वी अत्याचाराच्या प्रकरणात त्याला तीनवेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याविरोधात लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर तक्रारींची संख्या वाढत आहे. एसआयटीकडून (SIT)  कोठडी वाढवण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

मुलासमोर होणार चौकशी

तपासात (Investigation)  सहकार्य न केल्यामुळे आता अशोक खरातची चौकशी त्याच्या मुलासमोर करण्याची तयारी सुरू आहे. स्पष्ट माहिती न दिल्यामुळे तपासात अडथळे येत असल्याचे सूत्रांकडून समजते. अधिकाधिक माहिती मिळवून फरार पत्नीला अटक करणे हे सध्या एसआयटीचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सीए, पुजारी आणि सराफाची चौकशी

या प्रकरणात एसआयटीने काल मोठी कारवाई करत खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यवसायिकाची कसून चौकशी केली. आर्थिक व्यवहार, मंदिरातील हालचाली आणि फसवणुकीच्या व्यवहारांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

आज न्यायालयात हजेरीनंतर सरकारी पक्ष कोणती भूमिका मांडतो आणि एसआयटी कोणते पुरावे सादर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरणातील वाढत्या गुंतागुंतीमुळे पुढील तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा