बायणा येथील २३ वर्षीय तरूणावर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा; वेर्णा पोलिसांकडून अटक

पणजी : गोव्यात अल्पवयीन मुली तसेच महिलांवरील अत्याचाराचा वाढता आलेख संतापजनक आहे. दरम्यान सांकवाळ परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाविरोधात वेर्णा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीची ओळख अरुण चव्हाण, रा. बायणा-वास्को अशी पटवण्यात आली असून, पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि 'पोक्सो' (POCSO) सारख्या अत्यंत गंभीर कलमान्वये कारवाई सुरू केली आहे.
पीडित मुलीच्या आईने वेर्णा पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते ३० मार्च २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत संशयित अरुण चव्हाण याने पीडितेचा वारंवार विनयभंग केला आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे घृणास्पद कृत्य सांकवाळ येथील पीडितेच्या राहत्या घरी आणि वेळसांव समुद्रकिनाऱ्यावरील निर्जन स्थळी घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन संशयिताने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले होते.
वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम ६५ (१), गोवा बाल कायदा कलम ८(२) आणि पोक्सोच्या कलम ४ आणि ८ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेर्णा पोलीस स्थानका च्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्यांना पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांचे मार्गदर्शन आणि मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे सांकवाळ आणि वास्को परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. संशयिताने पीडितेवर दडपण आणून किंवा तिला धमकावून हा प्रकार सुरू ठेवला होता का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. सध्या संशयिताला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी आणि जबाब नोंदवण्याचे काम पूर्ण झाले आहे. गोव्यातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.