ईओसीची कारवाई : आठ वर्षे फरार असलेल्या ‘सहारा इंडिया’च्या माजी व्यवस्थापकाला अटक


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वास्को येथील सहारा इंडिया फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेडची २०१८ मध्ये ६.६९ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात मागील आठ वर्षे फरार असलेला माजी व्यवस्थापक यमन्नावरनम रघुवीर शर्मा तथा स्वामी यमन्नावरम रघुवीर शर्मा याला गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) तेलंगणा येथून अटक करण्यात यश मिळविले. दरम्यान, संशयिताला वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
सहारा इंडियाचे मुख्य क्षेत्रीय अधिकारी ए. के. त्रिपाठी यांनी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, सहारा इंडिया फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वास्को विभागाचे यमन्नावरनम रघुवीर शर्मा, कॅशियर के. वाय. शरीफ आणि झाकी खान या कर्मचाऱ्यांनी मिळून ३० सप्टेंबर २००४ ते ६ नोव्हेंबर २०१९ या काळात ७ कोटी ३० लाख १७ हजार ७७३ रुपयांची अफरातफर केली होती. त्यातील १ कोटी ५ लाख ४७ हजार २३ रुपये जमा केले होते. वरील संशयितांनी ६ कोटी ६९ लाख ६६ हजार ७७ रुपयांची अफरातफर करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याची दखल घेऊन ईओसीने वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वी संशयित यमन्नावरनम रघुवीर शर्मा फरार झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राझाशद शेख यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
या प्रकरणातील मुख्य संशयित तेलंगणात असल्याची माहिती निरीक्षक शेख यांना मिळाली. त्यानुसार, ईओसीचे अधीक्षक अर्शी अादिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राझाशद शेख, हवालदार रफीक मागोड आणि काॅन्स्टेबल दीप्तेश परब यांचे पथक २७ मार्च रोजी तेलंगणात दाखल झाले. त्यांनी तेलंगणा येथील बीएचईएलमध्ये असलेल्या श्री वेदामाता गायत्री क्षेत्र परिसरात चौकशी सुरू केली. संशयिताची पूर्ण ओळख पटल्यावर त्याला सोमवारी रात्री गोव्यात आणले. नंतर त्याला अटक केली. मंगळवारी संशयिताला वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
मुख्य पुजारी बनलेला संशयित असा आला जाळ्यात...
संशयित यमन्नावरनम रघुवीर शर्मा सात मंदिरांचा मुख्य पुजारी बनला होता. त्याच्या नेतृत्वाखाली १५ पुजारी कार्यरत होते.
तिथे संशयिताने ‘स्वामी यमन्नावरम रघुवीर शर्मा’ या नावाने धारण केले होते.
तो लग्न, जन्म पत्रिका तसेच इतर भविष्यवाणी सांगत होता. त्याचे अनेक भक्त आहेत.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात उत्सव सुरू होता. पोलीस पथकाने तेथेच दोन दिवस राहून संशयिताची खातरजमा करून घेतली.
२९ मार्च रोजी पथकाने जवळ जाऊन संशयिताला त्याच्या नावाने हाक मारली. त्याबरोबर त्याने प्रतिसाद दिला.
पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन आम्ही गोव्याचे पोलीस असून फसवणूक प्रकरणी ताब्यात घेण्यासाठी आलो असल्याची माहिती दिली. चालाखी दाखवल्यास वाईट परिणाम होतील. तुझीच बदनामी होईल, असे सांगितले.
त्यानंतर संशयिताने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.