बनावट ना हरकत दाखला प्रकरणात अटकेमुळे सध्या कोठडीतच

म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च क्लब’ अग्नीतांडव प्रकरणातील संशयित आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांची म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली आहे. हा जामीन अर्ज मंजूर झाला असला, तरी बनावट आरोग्य ना-हरकत दाखला (NOC) प्रकरणात म्हापसा पोलिसांनी त्यांना अटक केल्याने, प्रत्यक्षात कोठडीतून बाहेर येण्यासाठी त्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी जामीन अर्जावर आपला निवाडा दिला. न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी रक्कम आणि तेवढ्याच रकमेचा जामीनदार यासह इतर आवश्यक अटी लागू केल्या आहेत.
यापूर्वी १२ फेब्रुवारी रोजी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने लुथरा बंधूंचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर संशयितांनी पुन्हा नवीन अर्ज सादर केला. यावर ११ मार्च रोजी पहिली सुनावणी झाली होती. ६ डिसेंबर २०२५ रोजी साकवाडी-हणजूण येथील बर्च क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत ५ पर्यटकांसह २० कर्मचाऱ्यांचा, अशा एकूण २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर ६ जण गंभीर जखमी झाले होते.
हणजूण पोलिसांनी या प्रकरणात एकूण ११ जणांना अटक केली असून, १४ संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.
आमच्या अशील लुथरा बंधूंचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. सविस्तर निवाडापत्र मिळाल्यावर अटींची स्पष्टता होईल. आता आम्ही म्हापसा पोलिसांनी नोंदवलेल्या बनावट 'एनओसी' प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करणार आहोत. - अॅड. पराग राव