कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण : सोहमला आज बाल न्यायालयात करणार हजर

पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणात वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिलेल्या युवतीचा न्यायदंडाधिकाऱ्यांनी जबाब नोंद केला आहे. दरम्यान संशयित सोहम नाईक याला मंगळवारी पोलीस कोठडीसाठी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्या विरोधात आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील चार गुन्हे पीडितांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले आहे. दोन गुन्हे कुडचडे पोलिसांनी दाखल करून गुन्हा शाखेकडे वर्ग केले. यातील एका पीडितेवर १४ वर्षांची असताना लैंगिक अत्याचार झाला होता. दुसऱ्या पीडितेला लैंगिक छळ करून धमकी देण्यात आली होती. दोन्ही प्रकरणांतील पीडित मुलींचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंद करण्यात आला आहे. वरील प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्यानंतर आणखीन एका १४ वर्षीय मुलीने सोहमविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित सोहम नाईक याने तिच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर जबरदस्तीने तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आले. दुसरावेळी तिची सोनसाखळी हरवल्याचे म्हटले आहे. याची दखल घेऊन उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी संशयित सोहम याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता, गोवा बाल कायदा आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पाेक्सो)च्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सोहम नाईक याला अटक केली आहे. त्याला केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. ती सोमवारी संपली असून त्याला मंगळवारी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान आता पर्यंत दोघा पीडितांची न्यायदंडाधिकाऱ्यासमोर जबानी नोंद केली होती. सोमवारी १९ वर्षीय युवतींची जबानी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान गुन्हा दाखल केल्यानंतर सदर युवतीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला आहे.