जांभूळ, करवंद, चुन्नाचे दर वाढले; भाजीपाला स्थिर

पणजी : पणजी बाजारात सध्या रानमेवा दाखल झाल्याने त्याला अक्षरशः सोन्याचे मोल प्राप्त झाले आहेत. जांभूळ शंभर नगांसाठी तब्बल ५०० रुपये, चुन्ना ५० रुपये वाटा आणि करवंद १०० रुपये वाटा या दराने विक्री होत आहे.
रानमेव्याबरोबरच ओले काजूगर ४०० रुपये वाटा, तर काप्या फणसाचे गरे १०० रुपये वाटा या दराने विकले जात आहेत. मानकुराद आंब्याचे दर स्थिर असून दर्जानुसार १२००, १४०० आणि १५०० रुपये दरम्यान विक्री होत आहे.
भाजीपाल्याचे दर स्थिर
मागील आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले आहेत. लहान लसूण १५० रुपये, तर मोठा लसूण ४०० रुपये किलो आहे. आले १८० ते २०० रुपये किलो, कांदा, बटाटा आणि टोमॅटो प्रत्येकी ४० रुपये किलो दराने विकले जात आहेत. भेंडी, वांगी, कारले ८० रुपये किलो असून, मिरचीचे दर कमी होऊन १०० रुपये किलो झाले आहेत. फ्लॉवर ५० रुपये नग, कोबी ४० रुपये किलो, वालपापडी ८० ते १२० रुपये किलो आणि काकडी ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.
मेथी २५ रुपये जुडी, पालक व कांदापात १५ रुपये जुडी, शेपू २५ रुपये आणि कोथिंबीर ३० रुपये जुडी या दराने विक्री होत आहे. नारळ आकारानुसार ३० ते ५० रुपये दरम्यान उपलब्ध आहे.