ग्रामसभेच्या धर्तीवर नगरपालिका क्षेत्रातही 'नगर सभा' घ्या!

'टुगेदर फॉर म्हापसा'ची मागणी; नगरपालिका प्रशासन संचालनालयाला सादर केले सविस्तर निवेदन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
35 mins ago
ग्रामसभेच्या धर्तीवर नगरपालिका क्षेत्रातही 'नगर सभा' घ्या!

पणजी: पंचायतींच्या स्तरावर ज्याप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन केले जाते, त्याच धर्तीवर आता नगरपालिका क्षेत्रातही 'प्रभाग सभा' किंवा 'नगर सभा' घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'टुगेदर फॉर म्हापसा' या संघटनेने सोमवारी नगरपालिका प्रशासन संचालनालयाला (DMA) एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले.


या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासनाचे उपसंचालक आणि सचिवांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महेश राणे, जितेश कामत, विजय भिडे आणि इतर सदस्य उपस्थित होते. शिष्टमंडळाने निवेदनात नमूद केले आहे की, राज्यघटनेतील ७४ व्या दुरुस्तीनुसार आणि कलम २४३ (स) अंतर्गत प्रत्येक राज्यातील नगरपालिकांनी प्रभाग सभा किंवा नगर सभा घेणे अनिवार्य आहे. केरळ, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांनी या तरतुदीची अंमलबजावणी करून नगर सभा सुरू केल्या आहेत, परंतु गोव्यात अद्याप अशा सभांचे आयोजन केले जात नाही, ही खेदाची बाब आहे.

महेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, लोकशाहीला तळागाळापर्यंत नेण्यासाठी आणि तिला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यासाठी नगरपालिका स्तरावर या सभा होणे काळाची गरज आहे. सध्या नगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना आपले नागरी प्रश्न मांडण्यासाठी कोणतीही अधिकृत कायदेशीर यंत्रणा किंवा व्यासपीठ उपलब्ध नाही. जर प्रभाग सभांचे आयोजन झाले, तर सामान्य नागरिक आपले प्रश्न थेट नगरपालिकेपर्यंत पोहोचवू शकतील आणि त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. 

या मागणीसाठी 'टुगेदर फॉर म्हापसा'ने एक सविस्तर मसुदा तयार करून तो प्रशासनाला सादर केला आहे. यामध्ये घटनात्मक तरतुदींची सविस्तर माहिती देण्यात आली असून, गोव्यातील नगरपालिका कायद्यात आवश्यक सुधारणा करून नगर सभांचे आयोजन सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि प्रशासनात लोकांचा सहभाग वाढेल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला आहे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा