सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायातून समाजासाठी योगदान द्या!

उद्योजक अवधूत तिंबलो : तुडल-पैंगीण येथे श्रीरंग प्रभुगावकर विद्यामंदिराचे लोकार्पण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th April, 11:58 pm
सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायातून समाजासाठी योगदान द्या!

पैंगीण येथे श्रीरंग प्रभुगावकर ज्ञान मंदिराचे उद्घाटन करताना अवधूत तिंबलो. सोबत श्रीरंग प्रभुगावकर, प्रशांत नाईक, चेतन आचार्य व इतर. (अशोककुमार देसाई)

पैंगीण : स्वातंत्र्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती झाली असून तंत्रज्ञानामुळे शिक्षणात आमूलाग्र बदल झाले आहेत. मात्र, केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता युवकांनी स्वतःचा व्यवसाय निवडून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन उद्योजक अवधूत तिंबलो यांनी केले.
तुडल-पैंगीण येथे श्रीरंग रघुनाथ प्रभुगावकर विद्यामंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर या विद्यालयाला ६० लाख रुपये देणगी दिलेले श्रीरंग रघुनाथ प्रभुगावकर त्याच्या पत्नी भाग्यश्री प्रभुगावकर, श्री निराकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, गावडोंगरीचे सरपंच अशोक वेळीप, उपसरपंच सरिता वेळीप, संस्थेचे सचिव उमेश लोलयेकर, व्यवस्थापक चेतन आचार्य, किनळकट्टा येथील मधुकर वेळीप, मुख्याध्यापक तुकाराम वेळीप, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उमेश गावकर उपस्थित होते.
यावेळी श्रीरंग प्रभुगावकर यांनी सेवा हीच सर्वात मोठी भावना असल्याचे सांगत नव्या पिढीने कष्ट, ध्येय आणि निसर्गसंवर्धन यांना प्राधान्य द्यावे, असा सल्ला दिला. मुख्याध्यापक तुकाराम वेळीप यांनी विद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेत सांगितले की, १९९८ साली भाड्याच्या खोलीत सुरू झालेल्या या शाळेने आज मोठा विस्तार केला आहे. गेल्या २८ वर्षांत दहावीच्या २२ तुकड्या उत्तीर्ण झाल्या असून, सात वेळा १०० टक्के निकाल लागला आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी प्रास्ताविक करत शाळेच्या उभारणीत योगदान देणाऱ्यांचे आभार मानले. अभियंता प्रसाद पाणंदीकर, ठेकेदार अशोक थिरूर व पूनम फळदेसाई यांचा यावेळी गौरव करण्यात आला. सरपंच अशोक वेळीप यांनी तुडलसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची क्रांती घडवून आणल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. सूत्रसंचालन रमाली पागी व सुप्रिया देविदास यांनी केले, तर व्यवस्थापक चेतन आचार्य यांनी आभार मानले.
शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण घेत राहा!
उद्योजक अवधूत तिंबलो यांनी सांगितले की, शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया असून, शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण घेत राहावे. विज्ञानासोबत शेती, दुग्धव्यवसाय यांसारख्या क्षेत्रांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.      

हेही वाचा