ओवाळीये-पिसुर्ले येथे अॅम्बुलन्स कर्मचाऱ्यांचे अभिनंदनीय कार्य

स्ट्रेचरवरून रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेताना कर्मचारी.
वाळपई : ‘सेवा परमो धर्म’ या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा सत्तरी तालुक्यातील दुर्गम भागात आला. पिसुर्ले येथील ओवाळीये या अतिदुर्गम गावात रस्त्याची सुविधा नसतानाही रुग्णसेवेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस आणि समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
ओवाळीये गावात एक ५८ वर्षीय महिला बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळताच आपत्कालीन सेवांनी तत्काळ प्रतिसाद दिला. मात्र गावापर्यंत वाहनाने पोहोचणे शक्य नसल्याने अॅम्ब्युलन्स कर्मचारी आणि पॅरामेडिक्स यांनी तब्बल २ किमीचा पायी प्रवास करत घटनास्थळी धाव घेतली.
या पथकात ईएमटी अश्विनी शेटकर आणि पायलट अजित नारोजी यांचा समावेश होता. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रुग्णावर तत्काळ उपचार करून तिला सुरक्षितरीत्या साखळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे संबंधित महिलेची प्रकृती आता स्थिर असून ती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक
या उल्लेखनीय कार्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी समाजमाध्यमांद्वारे अॅम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, दुर्गम भागातील कोणताही नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, या भावनेने आमचे कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. आरोग्याच्या सुविधा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. भौगोलिक अडचणी असल्या तरी आरोग्य खात्याचे कर्मचारी तत्परतेने आपली सेवा बजावत आहेत, याचे हे उत्तम उदाहरण आहे.