एसआयआरनंतर फोंड्यात २३४ मतदार वाढले

पोटनिवडणुकीसाठी २८,१६१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क


49 mins ago
एसआयआरनंतर फोंड्यात २३४ मतदार वाढले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : एसआयआर मोहिमेनंतर फोंडा मतदारसंघाच्या मतदार यादीतून नावे वगळलेल्या काही मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून सोपस्कार पूर्ण केले. १६ मार्च २०२६ पर्यंत काही नवीन मतदारांनीही नोंदणी केली. त्यामुळे एकूण आता २३४ मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे मतदारसंंघातील मतदारांची एकूण संख्या २८,१६१ झाली आहे. ९ एप्रिल रोजी हे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
एसआयआर मोहिमेनंतर राज्यात फोंडा मतदारसंंघाची पहिलीच पोटनिवडणूक होत आहे. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी एसआयआरची यादी जाहीर झाली होती. नाव वगळल्याबद्दल केलेल्या अपिलांवर सुनावण्या सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या सात दिवस आधी पात्र असलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळतो. फोंडा पोटनिवडणुकीसाठी २३ मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. त्यामुळे १६ मार्च रोजी फोंड्याची मतदार यादी फ्रीज झाली.
मागील निवडणुकीत रवी नाईक फक्त ७७ मतांनी विजयी झाले होते. मगोचे डॉ. केतन भाटीकर यांनी त्यांना तुल्यबळ लढत दिली होती. भाजपचे रवी नाईक आणि मगोचे केतन भाटीकर यांच्यात फक्त एका मताचा फरक आल्याने फेरमतमोजणी झाली होती. फेरमतमोजणीनंतर रवी नाईक यांनी ७७ मतांनी भाटीकरांवर विजय नोंदवला होता. मागील निवडणुकीत मगोचे उमेदवार होते, तेच भाटीकर आता काँग्रेसकडून मैदानात आहेत. भाजपने दिवंगत आमदार रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांना रिंगणात उतरवले आहे. आता मतदारांची संख्या कमी झाल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील निवडणुकीच्या तुलनेत ३,९९६ मतदार कमी
२०२२च्या निवडणुकीच्या तुलनेत फोंडा मतदारसंघात आता ३,९९६ मतदार कमी झाले आहेत. मागील निवडणुकीत ३२,१५७ मतदार होते, आता २८,१६१ मतदार आहेत. यामध्ये पुरुष १४,०८४ आणि महिला १७,०७७ मतदार आहेत.
फोंडा मतदारसंंघातील मतदार
२०२२ विधानसभा निवडणुकीवेळी - ३२,१५७
२१ फेब्रुवारी २०२६ (एसआयआर यादी) - २७,९२७
१६ मार्च २०२६ (मतदार यादी फ्रीज) - २८,१६१
पुरुष - १४,०८४
महिला - १४,०७७