गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांवर महिन्याला १०४ अपघात

अपघातांची संख्या निम्म्यावर, मृत्यूचे प्रमाण कायम : ‘ब्लॅक स्पॉट’ ऑडिटसाठी दीड कोटींचा खर्च

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th April, 09:41 pm
गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांवर महिन्याला १०४ अपघात

पणजी : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर मागील दहा वर्षांच्या कालावधीत एकूण १२,५६८ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात तब्बल १,०५५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाकडून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी 'ब्लॅक स्पॉट' ऑडिटसारख्या उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी, अपघाती मृत्यूंचे सत्र अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेले नाही.

आकडेवारीनुसार, गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांवर दर महिन्याला सरासरी १०४ अपघात होत असून ८ जणांचा मृत्यू होत आहे. २०१५ च्या तुलनेत २०२४ पर्यंत अपघातांची एकूण संख्या निम्म्याने कमी झाली असली, तरी मृतांचा आकडा मात्र चिंताजनक रित्या स्थिर आहे. देशभरातही याच काळात सुमारे १४.१४ लाख अपघात झाले असून, त्या तुलनेत गोव्यातील स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

गोवा: राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा वर्षनिहाय आलेख

वर्ष एकूण अपघात अपघाती मृत्यू
२०१६१,४३८११३
२०१७१,४७०११८
२०१८१,४७०१०४
२०१९१,२४४१०७
२०२०७८७६१
२०२११,११६८३
२०२२१,२५९१२७
२०२३१,१२५१०२

ब्लॅक स्पॉट ऑडिटसाठी दीड कोटींचा खर्च:
राज्य सरकारने २०२२ ते २०२५ दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील १७ 'ब्लॅक स्पॉट'चे ऑडिट केले आहे. या कामासाठी प्रशासनाने १.५ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. महामार्ग वगळता राज्यातील इतर अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण यापेक्षाही दीडपटीने जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

#GoaRoadSafety #AccidentStatistics #NationalHighway #GoaTraffic #RoadSafetyAudit #GoaNews #BlackSpotGoa