आकय-म्हापसा येथील मंदिराच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

सात जण जखमी : सोमवारी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd April, 10:38 pm
आकय-म्हापसा येथील मंदिराच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

म्हापसा : आकय-म्हापसा येथील श्री सिमेश्वर ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थानात बुधवारी रात्री दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गटांना येत्या सोमवारी, ६ एप्रिल रोजी संयुक्त बैठकीसाठी बोलावले आहे. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि वीज दिवे बसवण्याच्या कारणावरून १ एप्रिलच्या रात्री हा तणाव निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश परवार आणि जयेश कळंगुटकर यांच्या गटात हा वाद झाला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण केली. या घटनेतील जखमींवर म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. घटनेनंतर दोन्ही गटांनी म्हापसा पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांनी तातडीने बैठक बोलावली होती, मात्र सिद्धेश परवार गट गैरहजर राहिल्याने आता सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

दीड वर्षांपासूनचा जुना वाद

या देवस्थानातील वादाला दीड वर्षांची पार्श्वभूमी आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष साईराज तोरसकर यांनी सात जणांची नवीन ट्रस्ट समिती स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला माजी पदाधिकारी जयेश कळंगुटकर यांच्या गटाने जोरदार विरोध दर्शविला होता. तेव्हापासून या दोन गटांत सातत्याने संघर्ष सुरू असून, म्हापसा पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणाची 'चॅप्टर केस' उपजिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केली आहे.

महत्त्वाच्या घटना तपशील
ताज्या हाणामारीचे कारण मंदिरात सीसीटीव्ही व वीज दिवे बसवणे
मागील राडा २२ डिसेंबर २०२५ (मारहाण व शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल)
पुढील सुनावणी सोमवार, ६ एप्रिल २०२६

यापूर्वी २२ डिसेंबर २०२५ रोजीदेखील मंदिरात अशाच प्रकारे वाद झाला होता, ज्यामध्ये सिद्धेश परवार यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कळंगुटकर आणि इतरांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले होते. सद्यस्थितीत म्हापसा पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, सोमवारच्या बैठकीत उपजिल्हाधिकारी काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#MapusaNews #TempleDispute #GoaCrime #SDMMapusa #LawAndOrder #MapusaPolice #GoaNews #DevasthanIssue