मडगावातील प्रकार : उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

रावणफोंड सर्कलदरम्यान टँकरद्वारे सांडपाणी वाहिन्याची सुरू असलेली सफाई.
मडगाव : रावणफोंड सर्कल ते नावेली फ्लायओव्हरपर्यंतच्या सांडपाणी वाहिनीला वारंवार टँकर आणून पाणी उपसा करत सफाई करावी लागत आहे. हॉटेल्स तसेच काही वैयक्तिक जोडणीतून सॅनिटरी पॅडस, तेल, कपडे असा कचरा टाकण्यात येत असल्याने हे प्रकार होत आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व मलनिस्सारण विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
मडगाव रेल्वेस्थानकाकडील रस्त्यावर याआधीच भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी केलेले खोदकाम अजूनही काम पूर्ण न झाल्याने जैसे थे आहे. याशिवाय फुटपाथवरील मातीचे ढिगारे कायम आहेत. एका बाजूने वाहतूक होत असतानाच आता सांडपाणी वाहिनी तुंबल्याने तिच्या स्वच्छतेसाठी खोदकाम करण्यात आले. सांडपाणी विभागाच्या ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार, वर्षातून एक ते दोनवेळा ही सांडपाणी वाहिनी तुंबण्याचे प्रकार घडतात. हॉटेल्स, रेस्टॉरंट व काही वैयक्तिक जोडणीतून सॅनिटरी पॅडस, कपडे, मळलेले पीठ व इतर कचरा याशिवाय जळालेले तेल अशा प्रकारचा कचराही टाकण्यात येतो. ही वाहिनी केवळ सांडपाणी वाहण्यासाठी असताना कचरा आल्यास त्या तुंबतात व त्यांच्या साफसफाईची कामे हाती घ्यावी लागतात, असेही स्पष्ट केले.
मडगाव रेल्वेस्थानकाकडील रस्त्यावरील सांडपाणी वाहिन्यांच्या साफसफाईसाठी रस्त्यांच्या खाली दबलेली झाकणे खोलण्यासाठी रस्ते खोदकाम केले जातात. पण, त्यांची योग्य डागडुजी केली जात नाही व वाहनचालकांना याचा त्रास होतो. या परिसरातील इमारतीतील नागरिकांनी सांगितले की, सांडपाणी वाहिनी तुंबल्यानंतर याचा परिणाम इमारतींतून सोडण्यात आलेेले सांडपाणी परत येते व यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते.
कडक कारवाईची मागणी
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मलनिस्सारण विभागाने कडक पावले उचलावीत. सांडपाणी वाहिनीत कचरा सोडणाऱ्या आस्थापनांची तपासणी करून त्यांना नोटिसा पाठवाव्यात. कचरा वाहिनीत जाऊ नये यासाठी जोडणीच्या ठिकाणी जाळ्या बसवणे अनिवार्य करावे. रस्ते खोदल्यानंतर त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.