सिलिंडरमध्ये एक ते दोन किलो गॅस कमी

मडगाव : राज्यात सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असतानाच, मडगावजवळील गिर्दोली येथे गॅस वितरकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गॅस सिलिंडरमधून गॅस चोरून कमी वजनाचे सिलिंडर वितरित करणाऱ्या वाहन चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक नागरिकांनी रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे संतापलेल्या नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सीच्या मालकाला पाचारण करून जाब विचारला असता, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाजीफोंड येथील एका गॅस एजन्सीची गाडी गुरुवारी दुपारी गिर्दोली भागात सिलिंडर वितरणासाठी गेली होती. यावेळी काही जागरूक नागरिकांनी गाडी अडवून चालकाला जाब विचारला. अनेकदा एजन्सीमध्ये हेलपाटे मारूनही सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत होते. याच संवादादरम्यान नागरिकांना गाडीतील काही सिलिंडर्सवर काळा कपडा झाकलेला दिसला. संशय बळावल्याने नागरिकांनी तो कपडा बाजूला केला असता, सिलिंडरमधून गॅस काढण्यासाठी वापरले जाणारे विशेष मशीन तिथे आढळून आले. चालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी प्रसंगावधान राखून चालक आणि डिलिव्हरी बॉय या दोघांनाही घटनास्थळी रोखून धरले.
नागरिकांनी स्वतःहून काही सिलिंडरचे वजन केले असता, त्यामध्ये प्रत्येकी एक ते दोन किलो गॅस कमी असल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच एजन्सीचे मालक अनिकेत नाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, कार्यालयीन कामकाजामुळे वितरणावेळी नेमके काय घडते यावर त्यांचे थेट नियंत्रण नसते. मात्र, अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांना त्वरित कामावरून काढून टाकण्यात येईल आणि ग्राहकांना योग्य वजनाचे सिलिंडर मिळतील याची खात्री दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी संतप्त ग्रामस्थांना दिले. गॅस टंचाईचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.