तिघांना गोमेकॉत उपचारानंतर घरी पाठवले

पणजी : गोव्यातील (Goa) आकय-म्हापसा (Mapusa) येथील श्री सिमेश्वर राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थानच्या (Shri Simeshwar Rashtroli Temple) ट्रस्टची नोंदणी व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून झालेल्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेत दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की व मारहाण झाली. त्यात सात जण जखमी झाले असून, तिघांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) (GMC) दाखल करण्यात आले. नंतर उपचार करून घरी पाठवण्यात आले.
इतरांवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या वादामागील नेमकी कारणे आणि जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. देवस्थान परिसरात पोलीस कुमक वाढवण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी प्रयत्नरत आहे.