एआय डेटा सेंटर्समुळे तापमानात २ अंशांची वाढ; ३४ कोटी लोकांवर परिणाम

अभ्यासातून निष्कर्ष

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 mins ago
एआय डेटा सेंटर्समुळे तापमानात २ अंशांची वाढ; ३४ कोटी लोकांवर परिणाम

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा झपाट्याने वाढता वापर आता पर्यावरणासाठीही चिंतेचा विषय ठरत असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. जगभर उभारल्या जाणाऱ्या मोठ्या एआय डेटा सेंटर्समुळे स्थानिक तापमानात सरासरी २ अंश सेल्सिअसने वाढ होत आहे. याचा परिणाम तब्बल ३४ कोटी लोकांवर होत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

अभ्यासानुसार, डेटा सेंटर्सच्या कार्यानंतर परिसरात ‘डेटा हीट आयलंड इफेक्ट’ निर्माण होतो. या प्रभावामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलते आणि जमिनीचे तापमान वाढते. काही ठिकाणी ही वाढ ९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

या संशोधनात जगभरातील ६,००० हून अधिक डेटा सेंटर्सचा (AI data centre)  अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे, तापमानवाढ केवळ डेटा सेंटरच्या परिसरापुरती मर्यादित नसून, ती जवळपास ९.९ किलोमीटरपर्यंतच्या भागावर परिणाम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोग्य, जीवनमानावर गंभीर परिणामाची शक्यता 

केंब्रीज विद्यापीठात ( University of Cambridge)  संशोधन केलेल्या अभ्यासातील प्रमुख संशोधकांनी इशारा दिला आहे की, एआयच्या वेगवान विस्तारामुळे पर्यावरणीय परिणामांचा पुरेसा विचार केला जात नाही. भविष्यात हा ‘डेटा हीट आयलंड इफेक्ट’ स्थानिक समुदायांच्या आरोग्य आणि जीवनमानावर गंभीर परिणाम करू शकतो.

पाण्याचाही प्रचंड वापर

एआय डेटा सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. विशेषतः उष्ण प्रदेशांमध्ये हे प्रमाण अधिक असते. एका अंदाजानुसार, १०० शब्दांचा एआय प्रॉम्प्ट तयार करण्यासाठी सुमारे ५१९ मिलिलिटर (एक बाटली) पाणी खर्च होते.

तसेच, मध्यम आकाराचे डेटा सेंटर्स दरवर्षी सुमारे ११ कोटी गॅलन पाणी वापरतात, जे जवळपास १,००० घरांच्या वार्षिक पाणी वापरा इतके आहे. मोठ्या डेटा सेंटर्सचा वापर याहून अधिक असून, काही केंद्रे दररोज ५० लाख गॅलनपर्यंत पाणी वापरतात.

शाश्वत एआयची गरज अधोरेखित

तापमानवाढ, जलसंकट?

या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी एआयच्या विकासासोबत पर्यावरणपूरक उपाययोजनांवर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. अन्यथा, तांत्रिक प्रगतीसोबतच तापमानवाढ आणि जलसंकट यांसारख्या समस्याही गंभीर रूप धारण करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा