इंडोनेशियात ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; एकाचा मृत्यू, घरांची पडझड

त्सुनामीचा इशारा नंतर मागे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20 mins ago
इंडोनेशियात ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; एकाचा मृत्यू, घरांची पडझड

जकार्ता : इंडोनेशियातील (Indonesia) मोलुक्का समुद्र परिसरात गुरुवारी ७.४ रिश्टर तीव्रतेचा जोरदार भूकंप (Earthquake)  झाला. या भूकंपामुळे एकाचा मृत्यू झाला असून; काही घरांची पडझड झाली.  किनारपट्टी भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हा इशारा मागे घेण्यात आला.

भूकंपाचे केंद्र टरनेट शहराच्या पश्चिम-उत्तर-पश्चिम (Tsunami) दिशेला सुमारे १२७ किलोमीटर अंतरावर आणि ३५ किलोमीटर खोलीवर होते. सुरूवातीला या भूकंपाची तीव्रता ७.८ इतकी नोंदवली गेली होती, मात्र नंतर ती ७.४ अशी सुधारण्यात आली.

उत्तर सुलावेसी प्रांतातील मिनाहासा जिल्ह्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मनाडो शहरात इमारत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते. तसेच एका व्यक्तीला दुखापत झाली आहे.

भूकंपानंतर किनारी भागात ०.३ ते १ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. इंडोनेशियाच्या हवामान विभागाने पाच ठिकाणी लहान त्सुनामी लाटा नोंदवल्या असून, सर्वाधिक ०.७५ मीटर लाट उत्तर मिनाहासामध्ये आढळली.

याशिवाय ११ धक्के (आफ्टरशॉक्स)  जाणवले असून; त्यातील सर्वात मोठा धक्का ५.५ तीव्रतेचा होता. प्रशासनाने किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेची खात्री होईपर्यंत समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

टरनेट शहरात काही घरांचे आणि चर्चचे नुकसान झाले असून; बिटुंग शहरातही नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. स्थानिक नागरिकांनी भूकंपाचे धक्के अत्यंत तीव्र असल्याचे सांगितले.

इंडोनेशिया ‘रिंग ऑफ फायर’ या भूकंपीय पट्ट्यात असल्यामुळे येथे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक होत असतात. सध्या प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून; पुढील धक्क्यांचा धोका लक्षात घेता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा